लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘महाज्योती’मध्ये पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी देण्यात येणारी १२६ कोटी रुपयांची फरकाची रक्कम निधीअभावी अद्याप देण्यात आली नाही. हा निधी मिळण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विकास विभागामार्फत वित्त विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे, अशी कबुली सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी विधानपरिषदेत दिली.
‘महाज्योती’मध्ये पीएच.डी. नोंदणी केलेल्या भटक्या, विमुक्त, ओबीसी, ‘एसबीसी’मध्ये पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांना मागील दोन वर्षांपासून कोणतीही फेलोशिप मिळाली नसल्याचा तारांकित प्रश्न आ. सुधाकर अडबाले यांनी विचारला होता. त्यावर शिरसाट म्हणाले, २०२१-२२ वर्षाची थकबाकी रक्कम देणे प्रलंबित आहे. हा निधी मिळाल्यावर शिष्यवृत्तीच्या फरकाची रक्कम देण्यात येईल.
सारथी, बार्टी, महाज्योतीचे समान धोरण तयार करणार२०२१-२२ मध्ये ६४८ विद्यार्थ्यांना ६५.०७ कोटी, २०२२-२३ मध्ये १२३६ विद्यार्थ्यांना ११६.९८ कोटी, तर २०२३-२४ मध्ये ९०१ विद्यार्थ्यांना १६ कोटी असा एकूण १९८.०५ कोटींचा निधी महाज्योती, नागपूरमार्फत अदा करण्यात आला आहे. सारथी, बार्टी, महाज्योतीचे समान धोरण ठरविण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. समितीचा अहवाल आल्यावर तो कॅबिनेटच्या मंजुरीसाठी सादर केला जाईल, अशी माहितीही मंत्री शिरसाट यांनी दिली.