Maharashtra Politics: मविआ नेत्यांनी घेतली राज्यपाल बैस यांची भेट; अर्थसंकल्पी अधिवेनापूर्वी राजकीय घडामोडींना वेग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 19:17 IST2023-02-26T19:16:27+5:302023-02-26T19:17:14+5:30
Maharashtra News: महाविकास आघाडीच्या नेत्यांची राज्यपाल रमेश बैस यांच्याशी चांगली चर्चा झाली, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

Maharashtra Politics: मविआ नेत्यांनी घेतली राज्यपाल बैस यांची भेट; अर्थसंकल्पी अधिवेनापूर्वी राजकीय घडामोडींना वेग
Maharashtra Politics: एकीकडे राज्यात अनेकविध मुद्द्यांवरून राज्यातील राजकारण तापलेले असताना दुसरीकडे राज्याच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. यातच शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यासाठी विरोधकांकडून तयारी केली जात असल्याचे सांगितले जात आहे. यातच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा दिल्ली दौऱ्यावर जाणार असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतल्यानंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार जितेंद्र आव्हाड, अनिल परब, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, सुनील प्रभू असे आम्ही अनेकजण भेटायला आलो होतो. भेटीमागील कारण एवढेच होते की, त्यांच्या शपथविधी कार्यक्रमाचे आम्हाला निमंत्रण होते पण त्यावेळी आम्ही मुंबईत नव्हतो. त्यामुळे त्यांना भेटता आले नव्हते. म्हणूनच आम्ही भेटायला आलो. अतिशय चांगली भेट झाली. सर्वांनी चर्चा केली, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
आम्ही त्यांच्या वाटचालीकरता शुभेच्छा दिल्या आहेत
रमेश बैस यांनी अनेक वर्ष रायपूरमधून खासदारकी केली. याशिवाय ते त्रिपुरामध्ये राज्यपाल होते. आता महाराष्ट्रात आले आहेत. आमची आजची चर्चा अतिशय समाधानी झाली. आम्ही त्यांना सांगितले की आमचे काही प्रश्न, समस्या असले तर तुम्हाला भेटू. त्यावर त्यांनी सांगितले सत्ताधारी आणि विरोधक असले तरी दोघांनी मिळून काम करायचे असते. आम्ही त्यांच्या वाटचालीकरता शुभेच्छा दिल्या आहेत. अर्थसंकल्पी अधिवेशनात त्यांचे अभिभाषण होणार आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्याआधी मुंबईत घडामोडींना वेग आला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधीमहाविकास आघाडीच्या नेत्यांची अतिशय महत्त्वाची बैठक पार पाडल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीत अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"