पेच कायम! कृत्रिम तलावांची खोली वाढविली तरीही काही मंडळे विसर्जन न करण्यावर ठाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 05:37 IST2025-02-12T05:37:04+5:302025-02-12T05:37:35+5:30
माघी गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याची हमी संबंधित सार्वजनिक गणेश मंडळांनी हमीपत्राच्या माध्यमातून दिली.

पेच कायम! कृत्रिम तलावांची खोली वाढविली तरीही काही मंडळे विसर्जन न करण्यावर ठाम
मुंबई - काही मंडळांनी कृत्रिम तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन न करण्याची भूमिका घेतली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मुंबई महापालिकेने मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची खोली वाढवली आहे. तरीही काही मंडळांनी कृत्रिम तलावात विसर्जन न करण्याची भूमिका कायम ठेवली आहे. त्यामुळे विसर्जनाचा पेच कायम असल्याचे चित्र आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची स्थापना करणार नाही, या अटीचे प्रामुख्याने सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी पालन करणे आवश्यक होते. माघी गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याची हमी संबंधित सार्वजनिक गणेश मंडळांनी हमीपत्राच्या माध्यमातून दिली. त्याआधारेच अर्जांची छाननी करून त्यांना परवानगी देण्यात आली, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.
काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी नैसर्गिक ठिकाणी मूर्तींचे विसर्जन करण्याचा आग्रह धरला आहे. मूर्तींची उंची अधिक असल्याने नैसर्गिक विसर्जन स्थळांवर योग्यरीतीने मूर्ती विसर्जन होईल, कृत्रिम तलावांची क्षमता पुरेशी नाही, असे या मंडळांचे म्हणणे होते. ही बाब लक्षात घेता उंच मूर्तींचे विसर्जन सुलभ व्हावे यासाठी पालिकेने कृत्रिम तलावांची खोली वाढवली आहे. पालिकेच्या परिमंडळ सात अंतर्गत एकूण चार ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. यात २५ ते १९ फुटांच्या मूर्तीचे विसर्जन होईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
परिमंडळ ७ मध्ये आता फक्त नऊ मूर्तींचे विसर्जन शिल्लक आहे. गोरेगाव-बांगूरनगर येथे ३० बाय ३० आकाराचा कृत्रिम तलाव आहे. पोलिस प्रशासनाच्या नियोजनानुसार तेथेदेखील विसर्जनासाठी मूर्ती नेण्यात येणार आहेत, अशी माहिती उपायुक्त (परिमंडळ ७) डॉ. भाग्यश्री कापसे यांनी दिली.
येथे मोठ्या मूर्तीचे विसर्जन
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असलेल्या कृत्रिम तलावात १५ फूट, दहीसर स्पाे र्ट्स फाउंडेशन येथे सहा फूट, कांदिवली पूर्वमध्ये महाराणा प्रताप उद्यान येथे सहा फूट, तर कदमवाडी मैदान येथे १९ फूट उंचीपर्यंतच्या मूर्तींचे विसर्जन होऊ शकेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
चारकोपचा राजा मंडळ ठाम
कृत्रिम तलावात विसर्जन न करण्यावर चारकोपचा राजा मंडळ ठाम आहे. मोठ्या मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात कसे करणार, विसर्जन केल्यानंतर त्या मूर्तींचे काय होणार, असा सवाल चारकोपचा राजा मंडळाचे अध्यक्ष निखिल गुढेकर यांनी केला.