Join us  

मध्य प्रदेशच्या चिंधी महाराजांची दिंडी, 'पाऊले चालती 1100 किमीची वाट'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2019 5:03 PM

वयवर्षे 15 पासून ते 70 वर्षांच्या वृद्धांपर्यंत भक्तीचा संचार पाहायला मिळतो.

मुंबई - मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातून एक दिंडी पंढरपूरच्या विठु-माऊलीचे दर्शन घेण्यासाठी येते. सवनेर येथील अर्धनारी नटेश्वर मंदिरपासून 25 मे रोजी ही दिंडी पंढरीच्या दिशने निघाली. या पालखीने 1 महिना 8 दिवसात जवळपास 1100 किलो मीटरचे अंतर पार केले आहे. मध्य प्रदेशमधील अत्यंत दुर्गम भागातील या वारकऱ्यांना विठ्ठल भेटीची लागलेली ओढ त्यांच्या चालण्या-बोलण्यातून दिसून येते. गेल्या सव्वा महिन्यांपासून ऊन, पाऊस वाऱ्याला सोबत घेऊन त्यांचा हा प्रवास सुरू आहे. विशेष म्हणजे या दिंडीचे नेतृत्व करत आहेत, चिंधी महाराज. 

चिंधी महाराजांच्या नेतृत्वात निघालेल्या या दिंडीत जवळपास 15 वारकरी भक्तांचा समावेश आहे. त्यामध्ये वयवर्षे 15 पासून ते 70 वर्षांच्या वृद्धांपर्यंत भक्तीचा संचार पाहायला मिळतो. विशेष म्हणजे वृद्ध महिलांचाही समावेश या दिंडीत आहे. या दिंडीत आकर्षण ठरतात ते चिंधी महाराज. फाटलेल्या गोधड्या, लोकांनी फेकलेले कपडे आणि जुनं धोतर परिधान केलेल्या चिंधी महाराजांचे विचार महान आहेत. माझे गुरूही अशाच प्रकारचे कपडे परिधान करत होते. त्यामुळे मीही गुरुजींच्या आदर्शावर चालत असल्याचे चिंधी महाराज यांनी म्हटले आहे. सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील खांडवीजवळ सध्या चिंधी महाराजांची दिंडी पोहचली असून आता लवकरच आम्ही विठ्ठल दरबारी पोहचणार असल्याचे महाराजांनी आनंदात म्हटलंय. 

महाराजांना त्यांच्या पोषाशाबद्दल विचारले असता, मी माझ्या गुरुंचा आदर्श घेऊनच जगत असल्याचे ते म्हणाले. आमच्या परंपरेनुसार मीही अशाच चिध्यांनी बनलेले कपडे परिधान करतो. आमची ही दुसरी पिढी असून दरवर्षी आम्ही मध्य प्रदेशातून पंढरपूरला पायी येतो. विठ्ठाचे चरण स्पर्श करण्यातच जीवनाची धन्यता असल्याचेही चिंधी महाराजांनी म्हटलंय. लोकांच्या त्यांच्या जगण्यातून फेकून दिलेला कपडा एकत्र करुन आम्ही आमचे वस्त्र बनवतो. कारण, अनेकांचे कपडे एकत्र केल्यास अनेकांचे गुण आपल्याकडे येतात, असे आम्ही मानत असल्याचे महाराजांनी म्हटले आहे. तेच खरा ईश्वर, प्रभू, अल्लाह आहे, असेही महाराजांनी म्हटलंय. दरम्यान, महारुद्र जाधव यांना चिंधी महाराजांसोबत  फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. महाराजांचे विचार आणि जीवन जगण्याची पद्धती भारावून टाकणारी असल्याचं जाधव यांनी म्हटलंय. तसेच, आपल्या फेसबुक अकाऊँटवरुन जाधव यांनी चिंधी महाराजांच्या दिंडीचे फोटोही शेअर केले आहेत. 

पंढरीच्या पांडुरंगाची महती जगात आहे. आषाढी एकादशीला पंढरपूर येथे मोठी जत्रा भरते. देशभरातून लाखो भाविक चंद्रभागेतिरी स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. भक्तीचा आणि वैष्णवांचा मेळा आषाढी एकादशीला जमतो. पंढरीच्या या मेळ्याची महती खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सांगतिली आहे. त्यामुळेच, विठ्ठल भेटीचा आस घेऊन विविध राज्यातून भक्तगण पंढरपूरला येतात. तर, तब्बल 1100 किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशातूनही पांडुरंगाच्या भेटीला दिंडी येते हेही तितकेच नवल.  

टॅग्स :पंढरपूरसोलापूरमुंबईपंढरपूर वारी