मधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष नाट्य महोत्सव

By संजय घावरे | Published: March 13, 2024 05:50 PM2024-03-13T17:50:52+5:302024-03-13T17:51:19+5:30

मधसूदन कालेलकर यांच्या मनोरंजन सृष्टीतील अमूल्य योगदानाला मानवंदना देण्यासाठी व आजच्या पिढीपर्यंत त्यांच्या कार्याची माहिती पोहोचावी या हेतूने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

Madhusudan Kalelkar Birth Centenary Special Drama Festival | मधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष नाट्य महोत्सव

मधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष नाट्य महोत्सव

मुंबई - नाटककार, गीतकार, लेखक, पटकथाकार, नाट्य-चित्रपट निर्माते अशा बहुआयामी भूमिकांमधून रसिकांना मनोरंजनाचा अमूल्य ठेवा देणाऱ्या मधुसूदन कालेलकर यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून मधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य आहे.

मधसूदन कालेलकर यांच्या मनोरंजन सृष्टीतील अमूल्य योगदानाला मानवंदना देण्यासाठी व आजच्या पिढीपर्यंत त्यांच्या कार्याची माहिती पोहोचावी या हेतूने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. दादर येथील श्री शिवाजी नाट्य मंदिर नाट्यगृहात १९ ते २२ मार्च या कालावधीत संध्याकाळी ७ वाजता हा महोत्सव होणार आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन तसेच मधुसूदन कालेलकर यांचे पुत्र अनिल कालेलकर, अलका कुबल-आठल्ये, विजय राणे, मनोहर सरवणकर यांच्या विशेष पुढाकाराने हा महोत्सव संपन्न होणार आहे. याअंतर्गत विविध कार्यक्रम होणार आहेत. कालेलकरांनी शब्दबद्ध केलेल्या सांगीतिक गीतांच्या मैफिलीचा विशेष सोहळा ज्येष्ठ दिग्दर्शक-अभिनेते राजदत्त, अभिनेते अशोक सराफ, सचिन पिळगांवकर आदि मान्यवरांच्या उपस्थितीत २२ मार्चला होणार आहे. नाटयमहोत्सव आणि सांगीतिक मैफिल सोहळा रसिकांसाठी विनामूल्य आहे. वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना अनिल कालेलकर यांनी हा महोत्सव आमच्यासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा असल्याच्या  भावना व्यक्त केल्या. 

या महोत्सवात मधुसूदन कालेलकर लिखित १९ मार्चला 'दिवा जळू दे सारी रात', २० मार्चला 'डार्लिंग डार्लिंग',  २१ मार्चला 'नाथ हा माझा' या नाटकांचे प्रयोग होतील. 'दिवा जळू दे सारी रात' तसेच 'डार्लिंग डार्लिंग' या नाटकांचे तीन अंक तीन वेगळ्या नाट्यसंस्था सादर करणार आहेत. 'डार्लिंग 'डार्लिंग'चा पहिला अंक पार्थ थिएटर्स यांच्या विद्यमाने दिग्दर्शक मंगेश सातपुते, दुसरा अंक श्री कलाधारिणी प्रॉडक्शन्स अंतर्गत दिग्दर्शक गणेश पंडीत, तिसरा अंक अनामयच्या वतीने दिग्दर्शक देवेंद्र पेम सादर करणार आहेत. 'दिवा जळू दे सारी रात' या नाटकाचा पहिला अंक अभिनय, कल्याण यांच्या वतीने दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव, दुसरा अंक व्हिजन व्हॉईस एनऍक्टच्या वतीने दिग्दर्शक श्रीनिवास नार्वेकर, तर तिसरा अंक माणूस फाऊंडेशनसाठी दिग्दर्शक डॉ. सोमनाथ सोनवलकर सादर करणार आहेत. 

ख्यातनाम नाटककार, गीतकार, हिंदी- मराठी चित्रपट लेखक कै. मधुसूदन कालेलकर यांचा जन्म २२ मार्च १९२४ वेंगुर्ल्यात झाला. मार्च २०२३-२०२४ हे कै. मधुसूदन कालेलकर यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु आहे. आपल्या कारकिर्दीत ११० हिंदी व मराठी चित्रपटांचे लेखन मधुसूदन कालेलकरांनी केले. ७० पेक्षा जास्त चित्रपट गीते लिहिली. ३० पेक्षा जास्त नाटके लिहिली. पाच नाटकांची निर्मिती केली. अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या मधुसूदन कालेलकरांना त्यांच्या 'हा माझा मार्ग एकला' या सिनेमासाठी १९६१ वर्षाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. मधुसूदन कालेलकर यांच्या  बहुविध प्रतिभेचे पैलू उलगडत त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारा हा महोत्सव रसिकांसाठी स्मरणरंजनाचा हृद्य अनुभव असणार आहे.

Web Title: Madhusudan Kalelkar Birth Centenary Special Drama Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.