नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 07:03 IST2025-09-18T07:02:16+5:302025-09-18T07:03:51+5:30
गेल्यावर्षी २६ ऑगस्ट रोजी अँटॉपहिल येथील एका तरुणाने दक्षिण सायबर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. फिर्यादीने नोकरीच्या शोधात लिंक्डइनवर आरोपी सलमान मुनीर शेख याच्याशी संपर्क साधला होता.

नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
मुंबई : दक्षिण सायबर पोलिसांनी सायबर गुलामी प्रकरणातील सूत्रधार सलमान मुनीर शेख याला अटक केली आहे. आरोपीने बेरोजगार तरुणांना थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून त्यांना सायबर फसवणुकीसाठी काम करण्यास भाग पाडले होते.
गेल्यावर्षी २६ ऑगस्ट रोजी अँटॉपहिल येथील एका तरुणाने दक्षिण सायबर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. फिर्यादीने नोकरीच्या शोधात लिंक्डइनवर आरोपी सलमान मुनीर शेख याच्याशी संपर्क साधला होता. आरोपीने त्याला थायलंडमध्ये डेटा एन्ट्रीच्या नोकरीचे आमिष दाखवले. फिर्यादी व त्याचा मित्र दोघेही तयार झाले आणि प्रत्येकी ३०,००० देऊन व्हिसा व तिकीट घेतले. ९ फेब्रुवारी २०२४ रोजी सलमान शेख फिर्यादीसह पाच जणांना बँकॉक, थायलंड येथे घेऊन गेला. मात्र, त्यांना लाओस देशात नेण्यात आले तेथे फसवणूक, खंडणीसारखे सायबर गुन्हे करण्यास त्यांना भाग पाडले.
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
आरोपी जाळ्यात...
आरोपी सलमान मुनीर शेख याने पासपोर्टवरील पत्ता बदलून मीरा रोड येथील नयानगर भागात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुप्त माहितीच्या आधारे त्याला १७ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली.
सायबर पोलिसांशी संपर्क करा...
थायलंड, कंबोडिया, म्यानमार व लाओसमध्ये नोकरीच्या ऑफर्सची सत्यता तपासा. एजंटकडून काम मिळत असल्यास त्याचे परवाने, प्रामाणिकता तपासा. तसेच, फसवणूक झाल्यासपोलिस ठाण्यात किंवा भारतीय दुतावासाशी संपर्क साधा. सायबर फसवणूक झाल्यास १९३० या क्रमांकावर संपर्क करा, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले.