Join us  

पहाटे गारवा, दुपारी रखरखीत ऊन; हवामानात पुन्हा चढ-उतार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 5:59 AM

विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता

मुंबई : राज्यातील बहुतांश शहरांच्या किमान तापमानात घट नोंदविण्यात येत असतानाच आता मुंबईकरांनादेखील पहाटेच्या सुमारास किंचित थंडी जाणवू लागली आहे. मुंबई शहरासह उपनगरात पहाटेच्या तापमानात घट होत असतानाच, कमाल तापमान मात्र ३२ अंशाहून अधिक असल्याची नोंद हवामान खात्याने केली आहे. परिणामी, पहाटे गारवा आणि दुपारी रखरखीत ऊन, अशा दुहेरी वातावरणाचा सामना मुंबईकर करत आहेत. दुसरीकडे हिवाळ्यातही पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून, १२ आणि १३ डिसेंबर रोजी विदर्भात अवकाळी पाऊस पडेल, अशी शक्यता स्कायमेटने वर्तविली आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, बुधवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान चंद्रपूर येथे १३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा, मराठवाड्याच्या काही भागांत लक्षणीय वाढ झाली. महाराष्ट्राच्या उर्वरित भागांत किंचित वाढ झाली.

स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, वातावरणातील बदलामुळे मध्य प्रदेशसह विदर्भावर एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. परिणामी, विदर्भाच्या काही भागांत १२ डिसेंबरच्या संध्याकाळपासून १३ डिसेंबरच्या दुपारपर्यंत गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. वातावरण ढगाळ किंवा अंशत: ढगाळ राहील.

दरम्यान, गुरुवारसह शुक्रवारी राज्यात ठिकठिकाणचे किमान तापमान १४ ते १८ अंश सेल्सिअसच्या घरात राहील. समुद्र किनाऱ्यावरील शहरांचे किमान तापमान २० अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. विदर्भात तापमान घसरण्याची शक्यता असल्याने, हिवाळा अधिक तीव्रतेने जाणवेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली.

राज्यासाठी अंदाज

१२, १३ आणि १४ डिसेंबर : विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील.

१५ डिसेंबर : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.

मुंबईत आकाश राहणार निरभ्र१२ आणि १३ डिसेंबर : आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३ आणि २२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.

टॅग्स :विधानसभा हिवाळी अधिवेशनमुंबईपाऊसविदर्भ