लोअर परळ पुलाची एक मार्गिका सुरू; दक्षिण मुंबईतील वाहनचालकांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 07:58 AM2023-06-02T07:58:52+5:302023-06-02T07:59:21+5:30

उर्वरित टप्प्यातील पूर्व दिशेचा पूल जुलैअखेरीस वाहतुकीसाठी संपूर्ण क्षमतेने सुरू केला जाणार आहे.

Lower Paral Bridge starts a route Relief for motorists in South Mumbai | लोअर परळ पुलाची एक मार्गिका सुरू; दक्षिण मुंबईतील वाहनचालकांना दिलासा

लोअर परळ पुलाची एक मार्गिका सुरू; दक्षिण मुंबईतील वाहनचालकांना दिलासा

googlenewsNext

वाहतूककोंडी फुटणार

मुंबई : लोअर परळ, वरळी, प्रभादेवी आणि करीरोड परिसरातील वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. डीलाईल पुलाचे ८७ टक्के काम पूर्ण झाले असून, एक मार्गिका गुरुवारपासून वाहनचालकांसाठी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे येथील वाहतूक कोंडी फुटण्यास काहीअंशी मदत होणार असून, उर्वरित टप्प्यातील पूर्व दिशेचा पूल जुलैअखेरीस वाहतुकीसाठी संपूर्ण क्षमतेने सुरू केला जाणार आहे.

मुंबई आयआयटी आणि रेल्वेच्या ऑडिटमध्ये हा पूल धोकादायक ठरविल्यानंतर २४ जुलै २०१८ रोजी वाहन चालक तसेच पादचाऱ्यांना वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. गेल्या पाच वर्षांपूर्वी जमीनदोस्त करण्यात आलेला लोअर परळ येथील डीलाईल पूल ३१ मे पर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले होते. या पुलासाठी १३८ कोटी खर्च करण्यात आले असून, पुलाचे बऱ्यापैकी काम पूर्ण झाले आहे. गुरुवारी या पुलाची एक बाजू सुरू करण्यात आली. लोअर परळ पश्चिमेकडील उर्मी इस्टेट आणि पेनिनसुला कॉर्पोरेट पार्क येथून रेल्वे स्पॅनपर्यंतची मार्गिका तसेच पुढे डावीकडे ना. म. जोशी मार्गावर वेस्टर्न रेल्वे वर्कशॉप आणि दादरच्या दिशेने जाणारी मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. 

असे करण्यात आले बांधकाम
     लोअर परळ येथील पुलाचे पुनर्बांधणीचे काम रेल्वे भागामध्ये पश्चिम रेल्वेकडून, तर पालिकेच्या हद्दीत पूल विभागामार्फत करण्यात येत आहे. 
     रेल्वे भागामध्ये एक जुन्या प्लेट गर्डरऐवजी नवीन दोन ओपन वेब गर्डर या पद्धतीने पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. 
     रेल्वेवरील भाग ओलांडण्यासाठी पुलाच्या तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ओपन वेब गर्डरच्या बाहेरील बाजूने पदपथ बांधण्यात आला आहे. पालिका क्षेत्रात ४ जिने व दोन सरकते जिने बांधून  पदपथ जोडण्यात येणार आहेत.

लोअर परळ पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामात ९० मीटर लांबीचे आणि ११०० टन वजनाचे दोन गर्डर हे पश्चिम रेल्वेच्या रूळांवर स्थापित करणे, हे संपूर्ण प्रकल्पातील सर्वात मोठे आव्हानाचे काम होते. 

Web Title: Lower Paral Bridge starts a route Relief for motorists in South Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.