कमी निकालाच्या शाळांची घेतली जाणार ‘शाळा’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 05:50 AM2019-12-21T05:50:34+5:302019-12-21T05:50:49+5:30

शिक्षण मंडळाचा निर्णय; शून्य ते ३० टक्के निकाल लागणाऱ्या संस्थांसाठी उद्बोधन वर्ग

Low result schools will be on target soon | कमी निकालाच्या शाळांची घेतली जाणार ‘शाळा’

कमी निकालाच्या शाळांची घेतली जाणार ‘शाळा’

Next

मुंबई : विद्यार्थी आणि शाळांचा यंदाचा दहावीचा एकूण निकाल घसरल्याने याची गांभीर्याने दखल घेत, राज्य शिक्षण मंडळाने पुढील वर्षीच्या परीक्षेआधी कमी टक्क्यांच्या शाळांची शाळा घेण्याचा निर्णय घेतला आहे.


मुंबई विभागात शून्य ते ३० टक्के निकाल असलेल्या तब्बल १६१ शाळा आहेत. यामध्ये पालघर, रायगड, ठाणे, दक्षिण मुंबई, उत्तर मुंबई व पश्चिम मुंबई या जिल्ह्यांतील शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये ही परिस्थिती का उद्भवली, शिक्षकांना विषयनिहाय कोणत्या अडचणी आहेत? याच्या कारणांचा शोध घेऊन, त्यावर उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश राज्य शिक्षण मंडळाने विभागीय शिक्षण मंडळांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई विभागीय शिक्षण मंडळाने मुंबईतील शिक्षण निरीक्षक आणि शिक्षणाधिकाऱ्यांना शाळांचे उद्बोधन वर्ग घेण्याच्या सूचना केल्या आहेत.


मुंबई विभागातील ६ जिल्ह्यांसाठी विषयनिहाय उद्बोधन वर्ग २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान शिक्षक व मुख्याध्यापकांसाठी आयोजित करण्यात आले आहेत. या शाळांतील मुख्याध्यापकांसाठी एका दिवसाची उद्बोधन कार्यशाळाही २४ डिसेंबरला होईल. मराठी, गणित, विज्ञान, इंग्रजी या चार मुख्य विषयांसाठी हे उद्बोधन वर्ग त्या-त्या शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आले आहेत. या विषयांतील तज्ज्ञ शिक्षकांकडून या वर्गांच्या दरम्यान शाळांतील शिक्षकांना काय अडचणी आहेत? विद्यार्थ्यांना हे विषय सहज आणि सोपे करून कसे सांगता येतील? या विषयांतील जास्तीतजास्त गुण कसे मिळविता येतील आदींचे प्रशिक्षण व मार्गदर्शन तज्ज्ञ शिक्षकांकडून करण्यात येईल, अशी माहिती मुंबई विभागीय सचिव शरद खंडागळे यांनी दिली.


मार्गदर्शन करणार
यंदा राज्यभरात शून्य टक्के निकाल लागणाºया शाळांच्या संख्येत वाढ झाली. मुंबईतील ४१ शाळांचा निकाल ० ते १० टक्क्यांमध्ये लागला आहे, तर शून्य टक्के निकालाच्या २३ शाळा आहेत. एकूणच कमी निकालाच्या शाळा या शिक्षण मंडळाच्या रडारवर होत्या. या शाळांतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या समस्या जाणून घेऊन, त्यांचे शंका निरसन केल्यानंतर, तसेच त्यांना योग्य मार्गदर्शन केल्यावर ते विद्यार्थ्यांची निकालाची टक्केवारी वाढवू शकतील, अशी अपेक्षा आहे. या उद्बोधन वर्गात शिक्षकांना कृतिपत्रिकांवरही योग्य आणि आवश्यक मार्गदर्शन केले जाईल, अशी माहिती खंडागळे यांनी दिली.

Web Title: Low result schools will be on target soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.