Join us  

कोकण मंडळातर्फे 9018 घरांची लॉटरी; 18 जुलैपासून अर्ज भरता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 8:09 PM

19 ऑगस्टला घरांसाठी सोडत 

मुंबई : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडाचा घटक असलेल्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे परवडणाऱ्या घरांची राज्यात सर्वात मोठी म्हणजेच नऊ हजार अठरा सदनिकांची विक्रमी सोडत जाहीर करण्यात आली आहे. यासाठी 18 जुलैपासून अर्ज भरता येणार आहे. वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या म्हाडाच्या मुख्यालयात १९ ऑगस्टला सकाळी दहा वाजता घरांसाठी सोडत काढली जाईल, अशी माहिती कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. विजय लहाने यांनी दिली.सदर सोडतीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शिरढोण (ता. कल्याण) येथील १९०५, खोणी (ता. कल्याण ) येथील २०३२ इतक्या अत्यल्प गटातील सदनिकांचा समावेश असून या सदनिकांकरिता भारतात कुठेही स्वमालकीचं घर नसलेला परंतु एमएमआरनं अधिसूचित केलेल्या सर्व क्षेत्रातील नागरिकच अर्ज करू शकतात. या योजनेतील घरांसाठी अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न तीन लाख इतके मर्यादित आहे.सदर सोडतीकरिता माहितीपुस्तिका व ऑनलाईन अर्ज म्हाडाच्या htpps://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याच संकेतस्थळावर अर्जदारांची नोंदणी १८ जुलै रोजी दुपारी २ वाजेपासून दि. ०८ ऑगस्ट रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत केली जाणार आहे. १० ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत अनामत रक्कम / अर्ज शुल्क ऑनलाईन भरण्याची मुदत देण्यात आली आहे. कोकण मंडळातर्फे यंदा प्रथमच अर्जदारांना NEFT / RTGS  द्वारे अनामत रक्कम भरण्याचा पर्याय देण्यात आला आहे. त्याचबरोबर  डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड , इंटरनेट बँकिंगद्वारे अनामत रक्कम भरता येणार आहे. या सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटाकरिताच्या सदनिकांचा समावेश आहे. अत्यल्प उत्पन्न गटाकरिता सन २०१७-२०१८ या आर्थिक वर्षातील अर्जदाराचं सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न (पती + पत्नी यांचे एकत्रित उत्पन्न) रु. २५,०००/ पर्यंत असावं. अल्प उत्पन्न गटाकरिता रु. २५,००१ ते रु. ५०,००० पर्यंत व मध्यम उत्पन्न गटाकरिता रु. ५०,००१ ते रु. ७५,००० पर्यंत तर उच्च उत्पन्न गटाकरिता अर्जदाराचं रु. ७५,००१ वा त्यापेक्षा जास्त सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न असणं आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कम (परतावा) + अर्ज शुल्क (विना परतावा) अत्यल्प उत्पन्न गटाकरिता रु. ५,४४८/- प्रति अर्ज, अल्प उत्पन्न गटाकरिता रु. १०,४४८ प्रति अर्ज, मध्यम उत्पन्न गटाकरिता रु. १५,४४८ प्रति अर्ज,  उच्च उत्पन्न  गटाकरिता रु. २०,४४८ प्रति अर्ज आकारली जाणार आहे. यामध्ये ऑनलाईन अर्जापोटी प्रतिअर्ज  रु. ४४८ (विना परतावा) अर्ज शुल्काचा समावेश आहे.यंदा अत्यल्प उत्पन्न गटासाठी मीरा रोड, बाळकूम ठाणे, शिरढोण (ता. कल्याण), खोणी (ता. कल्याण), मौजे अंतर्ली, खोणी हेदुटने, कोले (ता. कल्याण), मौजे उंबार्ली (ता. अंबरनाथ) येथील एकूण ४,४५५ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. अल्प उत्पन्न गटाकरिता मीरा रोड, कावेसर ठाणे, वेंगुर्ला सिंधुदुर्ग, विरार बोळींज, खोणी (ता. कल्याण), मौजे अंतर्ली, खोणी हेदुटने, कोले (ता. कल्याण), मौजे उंबार्ली (ता. अंबरनाथ) येथील ४३४१ सदनिकांचा समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटाकरिता बाळकूम (ठाणे), वेंगुर्ला (सिंधुदुर्ग), मीरा रोड, कुंवर बाव (रत्नागिरी), विरार बोळींज येथील एकूण २१५ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. तर उच्च उत्पन्न गटाकरिता वेंगुर्ला (सिंधुदुर्ग), मीरा रोड, कुंवर बाव (रत्नागिरी) येथील एकूण ७ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.  

टॅग्स :म्हाडामीरा रोडरत्नागिरीठाणेकल्याणअंबरनाथसिंधुदुर्ग