पनवेल एसटी आगार तोट्यात
By Admin | Updated: May 22, 2014 03:51 IST2014-05-22T03:51:50+5:302014-05-22T03:51:50+5:30
डिझेलचे वाढलेले दर, पथकर, प्रवासी कर त्याचबरोबर खाजगी वाहतूकदारांनी केलेले अतिक्रमण आदी कारणांमुळे पनवेल बस आगाराचे आर्थिक गणित जुळत नसल्याची माहिती उघड झाली आहे.

पनवेल एसटी आगार तोट्यात
प्रशांत शेडगे, पनवेल - डिझेलचे वाढलेले दर, पथकर, प्रवासी कर त्याचबरोबर खाजगी वाहतूकदारांनी केलेले अतिक्रमण आदी कारणांमुळे पनवेल बस आगाराचे आर्थिक गणित जुळत नसल्याची माहिती उघड झाली आहे. उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त असल्याने डेपो तोट्यात असून ताळमेळ बसवायचा कसा, असा प्रश्न व्यवस्थापनाला पडला आहे. पनवेल हे मुंबई व पुण्यापासून मध्यवर्ती ठिकाण असून येथून डोंबिवली, कल्याण, मुंब्रा, दादर, वाशी, बेलापूर आणि तालुक्यातील गावांमध्ये बस सोडल्या जातात. या व्यतिरिक्त शिर्डी, अहमदनगर, धुळे, कराड, फलटण या ठिकाणी लांब पल्ल्यांच्या गाड्या सुरू आहेत. सध्या आगारात ७९ बसेस असून त्या सुस्थितीत असल्याचा मंडळाचा दावा आहे. एकेकाळी मुंबई विभागात ‘प्रवासी वाढवा’ या मोहिमेत अग्रभागी असलेले हा डेपो फायद्यात होता. मात्र गेल्या एक दीड वर्षापासून मॅजिक गाड्यांनी एसटीचे जवळपास ५० टक्के प्रवासी पळवले आहेत. पनवेल ते खारघर, बेलापूर, नेरूळ आणि वाशी अशा मॅजिक अनधिकृतपणे व्यवसाय करीत आहेत. प्रवासीही या खाजगी वाहनांनी प्रवास करण्यास पसंती देत असून त्याचा परिणाम एसटीच्या व्यवसायावर झाला आहे. पनवेल बस आगारातून आवडेल तेथे प्रवास, विद्यार्थी पास, प्रासंगिक करारावर गाड्या भाड्याने दिल्या जातात. मात्र या वर्षी या योजनांनाही प्रवाशांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. याशिवाय लांब पल्ल्याच्या गाड्यांचे प्रवासी सुध्दा खाजगी ट्रॅव्हल्सवाले पळवित आहेत. त्यांना ठरावीक थांबे दिलेले असताना ते कोठेही बस थांबवून प्रवासी भरताना दिसतात. या खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांवर कारवाई करण्यास आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडून दुर्लक्ष होत आहे. एसटीला ठिकठिकाणी पथकर भरावा लागत असून त्यामुळे खर्चात अधिक भर पडत असल्याचे एका अधिकार्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. एसटीला शासनाला १७ टक्के प्रवासी कर अदा करावा लागत असल्याने उत्पन्नातील तो हिस्सा राज्य शासनाकडे वर्ग करावा लागतो. इतर राज्यात हा कर ५ टक्क्यांपेक्षा जास्त नाही. फक्त महाराष्ट्रातच तो अतिरिक्त असल्याने एसटीचे बजेट कोलमडले आहे. डिझेलच्या किमतीत दिवसेंदिवस वाढ होत असताना प्रवासी संख्येवर परिणाम होईल म्हणून तिकिटाचे दरही वाढवता येत नाही. परिणामी एसटीला त्याचा फटका सहन करावा लागतो. स्थानिक पातळीवर मिनीडोअर एसटीचे प्रवासी पळवत असून ग्रामीण भागात या सहाआसनी रिक्षांचे जाळे पसरले असल्याचे पनवेल बस आगारातील अधिकार्यांचे म्हणणे आहे.