Join us  

"जनतेच्या न्यायालयात हरणार"; नवनीत राणांच्या रडण्यावरुनही बच्चू कडूंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2024 3:16 PM

अमरावतीची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच नवनीत राणांना स्थानिक भाजपा नेते, शिवसेना पदाधिकारी आणि आमदार बच्चू कडूंचा विरोध होता.

मुंबई - भाजपाच्या अमरावतीमधील उमेदवार नवनीत राणा यांना आमदार बच्चू कडूंच्या प्रहाकडून आव्हान देण्यात आलं आहे. दुसरीकडे स्थानिक नेत्यांचा राणा यांच्या उमेदवारीला विरोध असून महाविकास आघाडीच्याही उमेदवाराचे त्यांना तगडं आव्हान आहे. त्यामुळे, अमरावतीच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच, खासदार राणा यांच्या उमेदवारीसाठीच्या जात प्रमाणपत्रावरुनही गोंधळ सुरु होता. मात्र, न्यायलायाने राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवल्याने त्यांचा जीव भांड्यात पडला. त्यानंतर, त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केली. यावेळी, पत्रकारांशी बोलताना नवनीत राणा यांना रडू कोसळले होते. त्यावर, आता आमदार बच्चू कडू यांनी खोचक टीका केली आहे. 

अमरावतीची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच नवनीत राणांना स्थानिक भाजपा नेते, शिवसेना पदाधिकारी आणि आमदार बच्चू कडूंचा विरोध होता. मात्र, तरीही भाजपाने त्यांना उमेदवारी दिल्यानंतर प्रहारकडून राणांविरुद्ध उमेदवार देण्यात आला आहे. 'प्रहार'चे उमेदवार दिनेश बूब यांनी नामांकन दाखल केले आहे. त्यातच, नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरल्यामुळे त्यांची मोठी अडचण दूर झाली अन् त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावर, आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच, राणा यांच्या रडण्यावरुनही टोला लगावला. 

''जनतेचं उत्तर काही वेगळं असून, त्या जनतेच्या न्यायालयात हरणार आहेत'', अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावरील निकालानंतर दिली. तसेच, रडणे म्हणजेच सहानभूती मिळवणे. पण, आता ती सहानभूती संपली असून, तुम्ही किती वेळा रडणार आहात. निवडणुकीत रडणं चांगले नसते. तुम्ही सामान्य लोकांसाठी रडल्या असतात तर आम्हाला त्याची कीव वाटली असती. तुम्ही तुमच्या उमेदवारीसाठी रडत असाल तर हेच दुर्देवीच, अशी टाकाही आमदार कडू यांनी नवनीत राणा यांच्या भावनिक होण्यावरुन केली आहे. 

मुलांची आठवणा सांगताना डोळ्यात अश्रू

नवनीता राणा यांच्या जातप्रमाणपत्रावरुन न्यायालयीन लढाई सुरु होती. सर्वोच्च न्यायालयात नवनीत राणा यांच्या बाजुने निकाल आला, आणि त्यांच्यासह भाजपा नेत्यांचा जीव भांड्यात पडला. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रश्नावर नवनीत राणा यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी, त्यांना अश्रू अनावर झाले होते. ''गेल्या अनेक वर्षापासून नवनीत राणा जेलमध्ये जातील, अशा वल्गना विरोधक करत होते. माझी छोटी छोटी मुलंही मला विचारायची, आई तू नेमकं काय केलंय, ज्याच्यामुळे तुला तुरुंगात जावं लागेल. पण सर्वोच्च न्यायालयाने माझ्या संघर्षाला न्याय दिला,'' असे नवनीत राणा यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर म्हटले. यावेळी, मुलांची आठवण सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. तर, अमरावतीत खासदार पत्नीच्या प्रचारासाठी आयोजित सभेत आमदार रवि राणांनी जोरदार भाषण केले. त्यावेळीही, नवनीत राणांना स्टेजवरच रडू कोसळले.  

टॅग्स :नवनीत कौर राणाबच्चू कडूलोकसभा निवडणूक २०२४अमरावती