शिवडी पाठोपाठ घाटकोपरमध्ये भरदिवसा ज्वेलर्स दुकानात लूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 09:36 IST2025-10-16T09:36:13+5:302025-10-16T09:36:24+5:30
मालकावर चाकू हल्ला; दुकानाबाहेर गोळीबार

शिवडी पाठोपाठ घाटकोपरमध्ये भरदिवसा ज्वेलर्स दुकानात लूट
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवडीतील लुटीची घटना ताजी असतानाच घाटकोपर पश्चिमेकडील गजबजलेल्या अमृतनगर परिसरात बुधवारी सकाळी १० वाजता सशस्त्र लुटीची घटना घडली. दोन लुटारूंनी दर्शन ज्वेलर्सच्या दुकानमालकावर चाकूने वार केले. तर, त्यांच्या साथीदाराने पळून जाताना हवेत गोळीबार केला.
दर्शन ज्वेलर्सचे दर्शन मिटकरी हे साफसफाई करत असताना दोन व्यक्ती दुकानात घुसल्या. त्यांनी चाकू आणि बंदुकीच्या धाकात दागिन्यांची लूट केली. दर्शन यांनी प्रतिकार केल्यानंतर एकाने चाकूने वार केले. दरम्यान, दुकानाबाहेर उभ्या असलेल्या साथीदाराने बंदुकीतून हवेत गोळी झाडली. त्यामुळे अमृतनगर सर्कल परिसरात काहीकाळ तणाव होता.
सीसीटीव्ही तपासले
याबाबत परिमंडळ सातचे उपायुक्त राकेश ओला यांनी सांगितले, लुटप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर घाटकोपर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.
दुकानातून अंदाजे किमान तीन तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याचा अंदाज आहे. जखमी दर्शन मिटकरी यांची प्रकृती सध्या स्थिर असून, त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक फरार आहे. तसेच तपासासाठी आणि एकाला पकडण्यासाठी पोलिसांनी सहा पथके तयार केली आहेत.
याआधी सोमवारी दुपारी शिवडी सत्र न्यायालयाजवळ सोन्याचे दागिने घडविणाऱ्या कंपनीचे तब्बल २.२९ कोटींचे दागिने चोरट्यांनी बंदुकीच्या धाकाने लुटले होते. याचा तपास सुरू आहे.