Join us
Daily Top 2Weekly Top 5

जामीन मिळवून देण्याचे आमिष दाखवत महिलेची लूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 04:12 IST

मुलाला पोलीस ठाण्यातून जामीन मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेला ३० लाखांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात योगेंद्र चतुर्वेदी नामक इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.

मुंबई : मुलाला पोलीस ठाण्यातून जामीन मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेला ३० लाखांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात योगेंद्र चतुर्वेदी नामक इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे. शशी ठाकूर असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. अंधेरीतील एका उच्चभ्रू इमारतीत मुलगा सनी याच्यासोबत त्या राहायच्या. मात्र गेल्या वर्षी श्रीलंकेसोबतच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये सट्टा लावल्याप्रकरणी त्यांच्या फ्लॅटमध्ये समाजसेवा शाखेने धाड टाकत सनीसह त्याचा मावस भाऊ तरुण ठाकूर आणि मित्र दीपक कपूर यांना अटक केली होती.या तिघांना अद्याप जामीन मिळाला नाही. त्यामुळे मुलाला जामिनावर सोडवण्याचा प्रयत्न ठाकूर करत होत्या. त्यांची एक मैत्रीण ज्योती सिंग हिने त्यांची ओळख चतुर्वेदीसोबत करून दिली. चतुर्वेदीने सनीला पोलीस ठाण्यातून जामीन मिळवून देण्यासाठी ५० लाखांची मागणी ठाकूर यांच्याकडे केली. अखेर ३० लाख देण्याचे ठरले आणि ती रक्कम ठाकूर यांनी चतुर्वेदीच्या सचिवाला दिली. तसेच दिवाळीच्या आधी सनीला जामीन मिळेल, असे आश्वासन त्याने ठाकूर यांना दिले. मात्र चार ते पाच महिने उलटूनदेखील जेव्हा सनी बाहेर आला नाही तेव्हा ठाकूर यांनी त्याचे आॅनलाइन स्टेटस पडताळले. तसेच चतुर्वेदीसुद्धा त्यांचा फोन घेणे टाळू लागला तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे ठाकूर यांच्या लक्षात आले आणि त्यांनी याविरोधात पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

टॅग्स :गुन्हेगारी