लांब चोचीच्या गिधाडांचा आता काढता येणार माग; १५ गिधाडांचे केले टॅगिंग, अभ्यासासाठी होणार मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 09:28 IST2025-12-26T09:28:26+5:302025-12-26T09:28:40+5:30
१५ गिधाडांपैकी ११ गिधाडांना जीएसएम टॅग, तर चार गिधाडांना जीपीएस टॅग बसविण्यात आले.

लांब चोचीच्या गिधाडांचा आता काढता येणार माग; १५ गिधाडांचे केले टॅगिंग, अभ्यासासाठी होणार मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि वन विभागाने मेळघाट व्याघ्र प्रकल्पात १५ लांब चोचीच्या गिधाडांचे नुकतेच यशस्वी टॅगिंग करण्यात आले. त्यामुळे गिधाडांची हालचाल, त्यांनी केलेल्या प्रवासाचे अंतर, सुरक्षितता आणि त्यांचा जंगलातील टिकाव यांचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांना मदत होणार आहे. गिधाडांची टॅगिंग मोहीम महाराष्ट्रात गिधाड संवर्धनासाठी मैलाचा दगड ठरणार असून, जैवविविधता संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.
१५ गिधाडांपैकी ११ गिधाडांना जीएसएम टॅग, तर चार गिधाडांना जीपीएस टॅग बसविण्यात आले. हे टॅग ‘हार्नेसिंग’ या सुरक्षित पद्धतीने, पाठीवर बॅकपॅकसारख्या हार्नेसद्वारे लावण्यात आले आहेत. सर्व टॅग सौरऊर्जेवर चालणारे आहेत. गिधाडांची हालचाल, प्रवासाचे अंतर, सुरक्षितता आणि जंगलातील टिकाव यांचा अभ्यास करण्यासाठी याची मदत होणार आहे. दरम्यान, सर्व गिधाडांच्या पायांमध्ये ओळख म्हणून निळ्या रंगाची रिंगही बसविण्यात आली आहे. त्यावर विशिष्ट ओळख क्रमांक आहेत. निळा रंग भारतात रिंगिंग केल्याचे दर्शवितो, तर एम हे अक्षर महाराष्ट्रातील मुक्तता स्थळ सूचित करते.
डॉ. सचिन रानडे यांनी टॅगिंग कार्यक्रमाचे नेतृत्व केले आहे. गिधाड पुनर्प्रस्थापना कार्यक्रमातील भास्कर दास आणि सुश्री अथिरा यांनी त्यांना सहकार्य केले. महाराष्ट्राचे मुख्य वन्यजीव संरक्षक श्रीनिवास रेड्डी हे संपूर्ण प्रकल्पावर वैयक्तिक लक्ष ठेवून मार्गदर्शन करीत आहेत.
हरियाणातील पिंजोर येथील गिधाड संवर्धन प्रजनन केंद्रात ही गिधाडे जन्मलेली असून, हे केंद्र बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे भारतातील पहिले केंद्र आहे. त्यानंतर या गिधाडांना मेळघाटमध्ये आणले गेले. नैसर्गिक वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी आवश्यक कालावधी देण्यात आला
बुलढाणा, अकोला, अमरावती जिल्ह्यांतील पशुसंवर्धन व अन्न व औषध प्रशासन विभाग, तसेच मध्य प्रदेशातील संबंधित विभागांचे सहकार्य गिधाडांना मिळेल, अशी आशा आहे.
- आदर्श रेड्डी, क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प.
गिधाडांना मुक्त करतानाच परिसर सुरक्षित करणे ही महत्त्वाची पायरी आहे. त्यासाठी परिसरात जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले. प्रतिबंधित व हानिकारक पशुवैद्यकीय औषधांचा वापर आणि विक्री थांबविण्यासाठी फार्मसी सर्वेक्षण करण्यात आले. या प्रक्रियेत औषध विक्रेते आणि स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग होता.
किशोर रिठे,
संचालक, बीएनएचएस