लोकमत - सभागृह नेत्यांचा वॉर्ड रिपोर्ट : पाण्यासाठी जागरण, प्राथमिक सुविधाही नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 12:56 IST2026-03-11T12:56:13+5:302026-03-11T12:56:34+5:30
कोळीवाड्याच्या सीमांकनाभावी अनेक सुविधांवर ताण वाढत आहे. पार्किंग समस्येचा विळखा या भागाला कायम असून त्यामुळे परिसरातील वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

लोकमत - सभागृह नेत्यांचा वॉर्ड रिपोर्ट : पाण्यासाठी जागरण, प्राथमिक सुविधाही नाहीत
सीमा महांकडे,
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईला दुसऱ्या महानगरपालिकेशी जोडणाऱ्या दहिसरमधील प्रभाग क्रमांक ७ म्हणजे संमिश्र वस्तीचा परिसर आहे. एका बाजूला कोळीवाडे, गावठाणे आणि दुसरीकडे आयसी कॉलनीसारखा उच्चभ्रू परिसराचे नेतृत्व पालिकेचे सभागृह नेते गणेश खणकर यांच्याकडे आहे. दहिसर नदी लाभलेल्या या प्रभागात निसर्गाचा सहवास असला तरी वस्त्यांतील पाणीटंचाई, अपुरी शौचालये यासारख्या प्राथमिक सुविधांभावी नागरिक बेजार आहेत.
कोळीवाड्याच्या सीमांकनाभावी अनेक सुविधांवर ताण वाढत आहे. पार्किंग समस्येचा विळखा या भागाला कायम असून त्यामुळे परिसरातील वाहतूक कोंडीत भर पडत आहे.
दहिसर नदीचा बराचसा भाग हा परिसरातून जात असून त्याच्या प्रदूषणाचा विषय या परिसरासाठी महत्त्वाचा आहे. हा मुद्दा सोडवण्यासाठी तेथे STP प्रकल्पाचे काम सुरू असून ते सुरू झाल्यानंतर हा प्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटणार आहे. त्यामुळे हे प्रकल्प केव्हा कार्यान्वित होणार याकडे स्थानिकांचे लक्ष आहे. दहिसर रेल्वे स्थानकापर्यंत थेट 'बेस्ट'ची बससेवा नसणेही परिसरातील नागरिकांसाठी अडचण आहे.
प्रभागाचा लेखाजोखा
६०% : इमारत क्षेत्र
२०% : गावठाण
२०% : झोपडपट्टी
प्रभाग क्रमांक : ७
विभागाचे नाव : आर उत्तर
विधानसभा मतदारसंघ : दहिसर (१५३)
लोकसभा मतदारसंघ : मुंबई उत्तर
प्रभागातील मतदारसंख्या : ३९,५२१
असे आहे प्रभागाचे भौगोलिक क्षेत्र
प्रमुख रस्ते : लक्ष्मण म्हात्रे मार्ग, होली क्रॉस रोड, मिठागर रोड, संतोषी माता रोड
महत्त्वाचे परिसर : दहिसर गावठाण, कांदरपाडा, दहिसर नदी, आयसी कॉलनी
शैक्षणिक संस्था : मेरी इम्रक्युलेट स्कूल, कांदरपाडा मराठी स्कूल, जेबीसीएन स्कूल, सेंट लुईस स्कूल
धार्मिक स्थळे : श्री गणेश मंदिर, सेंट लुईस चर्च, स्वामी समर्थ मठ
रुग्णालये : एचसीजी कॅन्सर हॉस्पिटल, सिल्वरलाईन हॉस्पिटल, महापालिका पोस्ट दवाखाना
उद्याने : साने गुरुजी उद्यान, कुमार म्हात्रे गार्डन
प्रभागातील प्रमुख समस्या
पाणीटंचाई : कमी दाबाने आणि रात्री १२ च्या सुमारास होणारा पाणीपुरवठा यामुळे नागरिक हैराण आहेत. पाण्यासाठी करावे लागणारे जागरण नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.
पार्किंग : रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभा करण्यात येणाऱ्या गाड्यांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. पार्किंगची समस्या ही या प्रभागातील मोठी समस्या आहे.
सीमांकन : कोळीवाडे-गावठाणाच्या भागाचे सीमांकन रखडल्यामुळे घरांमध्ये प्राथमिक सुविधा, दुरुस्तीमध्ये अडचणी येत आहेत.
प्रदूषण : पश्चिम उपनगराच्या टोकाची बाजू असल्याने अनेक मोकळ्या मैदानात टाकला जाणारा राडारोडा येथील प्रमुख समस्या बनली आहे. यामुळे प्रदूषणातही भर पडत आहे.
अतिक्रमणे : काही झोपडपट्टी भागात वेगाने वाढणारे अतिक्रमण नागरिकांसाठी अडचण बनत आहे. शिवाय प्रमुख रस्त्यावर अनधिकृत फेरीवाल्यांचे अतिक्रमण आहे.
स्थानिक काय म्हणतात?
"आमच्या गावठाणांचा प्रश्न प्राधान्याने घेऊन त्यांचे सीमांकन प्रशासनाने मार्गी लावावे. अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असून यामुळे प्राथमिक सुविधांमध्ये येणारा अडथळा त्रासदायक ठरत आहे."
- जेमिनी फर्नांडिस, आयसी कॉलनी
"परिसरात वाहतूक कोंडी खूप होते. दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्या, पार्किंगसाठी जागा यांचे गणित जुळत नसल्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. यामुळे प्रदूषणात भर पडत आहे."
- दिनेश म्हात्रे, कांदरपाडा स्थानिक
लोकप्रतिनिधी आणि प्रशासन
"प्रभागातील झोपडपट्टीत घरोघरी शौचालय असणे याला प्राधान्य देत आहे. शिवाय महिलांना रात्री १२ पर्यंत पाण्यासाठी जागरण करावे लागू नये, यासाठी अधिकाऱ्यांशी बोलणी सुरू केली आहे. दहिसर नदीच्या दोन्ही बाजूला सुशोभीकरण करून, डेकोरेटिव्ह लाईट्स वापरून ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा उपलब्ध करून द्यायचा आहे. अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली आहे."
-गणेश खणकर, सभागृह नेते व नगरसेवक
"वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी रस्ते रुंदीकरण लवकर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. याशिवाय प्रभागातील मैदानांची सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचा प्रयत्न आहे. अनेक ठिकाणी सौंदर्यीकरण नियोजित आहे."
-नयनीश वेंगुलेंकर, सहाय्यक आयुक्त, आर उत्तर विभाग
प्रभागाचे रेटिंग
रस्ते : ★★★☆☆
स्वच्छता : ★★★☆☆
हवेचा दर्जा : ★★★★☆
आरोग्य : ★★★★☆
पार्किंग : ★★☆☆☆
(अतिशय चांगले - ५ स्टार, चांगले - ४, ठीकठाक - ३, वाईट - २, अत्यंत वाईट - १)