मुंबई : उद्योग, कला, समाज आदी क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरीने ट्रेंड तयार करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करण्यासाठी ‘लोकमत ट्रेंड सेटर्स’ हे पुरस्कार दिले जातात. यंदाचा सोहळा शनिवार, २३ जानेवारी रोजी महाराष्ट्र आणि गोव्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.ट्रेंड सेटर्स म्हणून नावाजलेल्या व्यक्ती, संस्थांना अभिवादन करण्याचा हा एक प्रयत्न आहे. त्यांच्या परिश्रमांवर प्रकाश टाकत त्यांची यशोगाथाही सोहळ्यात उलगडली जाणार आहे. आंतरदेशीय विमानतळानजीकच्या सहारा स्टार या हॉटेलमध्ये शनिवारी सायंकाळी ६ वाजता ‘लोकमत ट्रेंड सेटर्स सन्मान सोहळा’ रंगणार आहे. त्यात सुमारे ३४ विजेत्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात येईल.या सोहळ्यास राज्यपाल कोश्यारी यांच्यासह जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर आणि निर्माता, दिग्दर्शक व अभिनेता नागराज मंजुळे तसेच लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन विजय दर्डा हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा निमंत्रितांसाठी असून कोरोना काळातील सर्व बंधने पाळून त्याचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यपालांच्या हस्ते उद्या हाेणार लोकमत ट्रेंड सेटर्सचा गौरव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 06:10 IST