Join us

‘सहारा’ने केले कायद्यालाच बेसहारा; ‘लोकमत’च्या बातमीनंतर ‘एक्साईज’ जागा; दिवसभर मुक्काम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 10:00 IST

‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक हॉटेल सहारा स्टारमध्ये पोहोचले.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी मद्यविक्रीस मनाई असतानाही सोशल मीडियावर जाहिरातबाजी करून अंधेरी येथील पंचतारांकित हॉटेल सहारा स्टारमध्ये मद्यविक्री केली जाण्याच्या प्रकरणाची राज्य उत्पादन शुल्क विभागाने चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक चौकशीत या हॉटेलातील सहारा बॅरल या बारमध्ये चार नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले असून त्याबाबत लवकरच हॉटेलला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असून त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसमोर या प्रकरणाची सुनावणी होईल.

यासंदर्भात, सोमवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक दुपारी हॉटेल सहारा स्टारमध्ये पोहोचले. तेथील पाहणीत या हॉटेलमध्ये विदेशी मद्यविक्रीचे एकूण चार परवाने असल्याने आढळले. मात्र, हे परवाने मिळवताना ड्राय डे असताना मद्यविक्री करणे, मंजूर नकाशा नसणे, नाेकरनामा नसणे अशा प्रकारचे नियमांचे उल्लंघन झाल्याचे अधिकाऱ्यांना आढळले. 

याबाबत हॉटेलला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असून त्यानंतर या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी होईल, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमप यांनी सांगितले.  त्याचप्रमाणे मद्यविक्री केल्याच्या दुसऱ्या दिवसाच्या तारखेचे बिल देण्याबाबत तसेच त्यावरील जीएसटी क्रमांकाचीही शहानिशा करण्यात येणार आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :लोकमत इम्पॅक्टउत्पादन शुल्क विभाग