Lokmat Maharashtrian Of The Year Award 2018 Performing Arts Category Winner Singer Shreya Ghoshal | LMOTY 2018: 'आवाजाची राणी' श्रेया घोषालला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' सन्मान

LMOTY 2018: 'आवाजाची राणी' श्रेया घोषालला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' सन्मान

मुंबईः आपल्या गोड गायकीनं तमाम संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारी गायिका श्रेया घोषाल हिला आज 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर 2018' या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. 'परफॉर्मिंग आर्टस' या गटात श्रेयानं बाजी मारली.  

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' पुरस्काराचं हे पाचवं पर्व आहे. राजकारण, समाजसेवा, कला, क्रीडा, प्रशासन, उद्योग अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिलेदारांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. मान्यवर परीक्षकांनी केलेलं मूल्यमापन आणि वाचकांचा कौल या आधारे हा विजेता निश्चित करण्यात येतो. महालक्ष्मीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये सुरू असलेल्या दिमाखदार सोहळ्यात श्रेयाला सन्मानित करण्यात आलं.

श्रेया घोषालनं आपल्या आवाजानं सगळ्यांच्याच मनात घर केलं आहे. संजय लीला भन्सालीच्या 'देवदास' या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पहिलं पाऊल टाकणाऱ्या श्रेयानं 'डोला रे'च्या तालावर सगळ्यांनाच डोलवलं. त्यानंतर, मागे वळून पाहण्याचा प्रश्नच नव्हता. उलट, लोकप्रियतेची नवनवी शिखरं तिने सर केली आणि आज सर्वोत्तम गायकांच्या पंक्तीत तिनं स्थान मिळवलं आहे. केवळ बॉलीवूडमध्येच नव्हे, तर अनेक मराठी चित्रपटांमध्ये देखील एकापेक्षा एक सरस गाणी श्रेयानं गायली आहेत. सगळ्याच पठडीतील गाणी ती तितक्याच ताकदीने गाते. अनेक मानाच्या पुरस्कारांवर तिनं नाव कोरलं आहे. त्यात आता, 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर'ची ट्रॉफीही उठून दिसतेय. 

'देवा' या चित्रपटात श्रेयाने गायलेले 'रोज रोज नव्याने' हे गाणे प्रेक्षकांना प्रचंड आवडले. या रोमँटिक गाण्यात श्रेया घोषालला सोनू निगमची साथ लाभली आहे. प्रेमाच्या श्रवणीय जगात घेऊन जाणारे हे गाणे क्षितीज पटवर्धन यांनी लिहिले असून, संगीत दिग्दर्शक अमितराज यांनी या गाण्याला चाल दिली आहे. हे गाणे प्रेमीयुगुलांसाठी तर पर्वणी ठरले आहे. या गाण्याला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली असून, अंकुश चौधरी, तेजस्विनी पंडित यांच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. ‘देवा’ या चित्रपटात प्रेक्षकांना माया आणि देवाची प्रेमकथा पाहायला मिळाली होती. माया ही लेखिका तर देवा हे अतरंगी कॅरेक्टर आहे. अंकुश चौधरीने साकारलेल्या देवासारखीच मायाही अतरंगीच आहे. ती कुठलीही गोष्ट ठरवून करत नाही. ती सतत फिरतीवर असते आणि नावीन्य शोधण्याचा प्रयत्न करत असते. मायाच्या अतरंगीपणाला श्रेयाने तिच्या आवाजात लोकांसमोर आणले आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Lokmat Maharashtrian Of The Year Award 2018 Performing Arts Category Winner Singer Shreya Ghoshal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.