एमटीएचएल प्रभाव क्षेत्रात १५ बिलियन डॉलरची गुंतवणूक येणार: डॉ. संजय मुखर्जी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2024 13:34 IST2024-10-10T13:34:05+5:302024-10-10T13:34:33+5:30
मुंबई महानगरातील पायाभूत सुविधांवर चर्चा करण्यासाठी कफ परेड येथील ताज प्रेसिडेंट हॉटेल येथे आयोजित ‘लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह’मध्ये मुखर्जी बोलत होते.

एमटीएचएल प्रभाव क्षेत्रात १५ बिलियन डॉलरची गुंतवणूक येणार: डॉ. संजय मुखर्जी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून एमटीएचएल प्रभाव क्षेत्रात नव्या शहराची निर्मिती केली जाणार आहे. त्यातून दरवर्षी ५० हजार ते ७५ हजार नोकऱ्या निर्माण होतील. तसेच या भागात १४ ते १५ बिलियन डॉलर एवढी पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक येईल, अशी अशा एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी व्यक्त केली.
मुंबई महानगरातील पायाभूत सुविधांवर चर्चा करण्यासाठी कफ परेड येथील ताज प्रेसिडेंट हॉटेल येथे आयोजित ‘लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह’मध्ये मुखर्जी बोलत होते. यावेळी सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर उपस्थित होते.
नवी मुंबई विमानतळ प्रभाव क्षेत्रातील आणि त्याच्या नजीकच्या परिसरातील १२४ गावांचा या नव्या नगरात समावेश असेल. या न्यू टाऊन डेव्हलपमेंट ऑथाॅरिटीसाठी एमएमआरडीएची नियुक्तीचा प्रस्ताव सरकारला पाठविला आहे. या प्रकल्पातून या भागाचा कायापालट होणार आहे, असेही मुखर्जी यांनी नमूद केले.
मुंबई महानगराचा विकास भविष्यात होतच राहणार आहे. हा विकास नियोजित पद्धतीने होणार की नाही एवढा प्रश्न आहे. आपल्याला वर्ल्ड क्लास शहरे निर्माण करायची आहेत. हा विकास अन्य देशांकडे पाहून जसाच्या तसा न करता तो आपल्या गरजांनुसार केला जाणार आहे, असेही मुखर्जी यांनी नमूद केले.
एमएमआरडीएचे क्षेत्र पालघर आणि रायगडपर्यंत विस्तारले आहे. त्यातून एमएमआरडीए हे देशातील सर्वात मोठे नियोजन प्राधिकरण झाले आहे. एमएमआरडीएकडून या भागात आता ग्रोथ सेंटरचा विकास केला जाणार आहे. ही प्रत्येक ग्रोथ सेंटर ही विशिष्ट थीमवर आधारित असतील. त्यामध्ये लॉजिस्टीक, इंडस्ट्री, सर्व्हिसेस, आयटी/आयटीएस, गेमिंग अन्य उद्योग व्यवसायांचा समावेश असेल, असेही मुखर्जी यांनी सांगितले.
पुढील पाच वर्षांत मुंबई महानगरात पाच लाख कोटी रुपयांचे प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यातून एमएमआरचा कायापालट होणार आहे, असेही मुखर्जी यांनी नमूद केले. तसेच यातून मुंबई, पालघर, ठाणे, रायगडमध्ये जलद वाहतुकीसाठी विविध रिंग रोड प्रकल्प हाती घेतले असून, त्यातून या भागातील वाहतूक जलद होणार आहे.