Lok Sabha polling due to VVPAT verification will delay three hours | व्हीव्हीपॅटच्या पडताळणीमुळे लोकसभेच्या मतमोजणीस होणार नेहमीपेक्षा तीन तास विलंब

व्हीव्हीपॅटच्या पडताळणीमुळे लोकसभेच्या मतमोजणीस होणार नेहमीपेक्षा तीन तास विलंब

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्कंठता असल्याने सर्वांचे लक्ष २३ मेच्या मतमोजणीकडे लागले आहे. मात्र मतमोजणी होताना व्हीव्हीपॅटच्या पावत्यांच्या पडताळणीमुळे निकालाला २ ते ३ तास विलंब होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रत्येक लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघातील एका बुथवरील व्हीव्हीपॅटच्या पावत्यांची पडताळणी होईल. या प्रक्रियेत थोडा वेळ जाण्याची शक्यता असल्याने अंतिम निकाल जाहीर होण्यास विलंब होईल, अशी माहिती राज्याचे अप्पर मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. व्हीव्हीपॅट यंत्रामधील मतदानाच्या पावत्यांची पडताळणी ईव्हीएम मशीनमधील मतदानाशी करण्यात येईल. प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील विधानसभेतील पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटची पडताळणी होईल. एका लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. एका लोकसभा मतदारसंघातील ३० केंद्रांवरील व्हीव्हीपॅटची पडताळणी होईल. राज्यात ४८ लोकसभा मतदारसंघांतील १,४४० केंद्रांवरील व्हीव्हीपॅटची पडताळणी होईल. त्यामुळे निकालास २ ते ३ तास विलंब होण्याची शक्यता शिंदे यांनी वर्तवली आहे. दरम्यान, एकाच वेळी सर्व विधानसभेतील व्हीव्हीपॅट यंत्रांच्या पावत्यांची पडताळणी करा, अशी मागणी निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांकडून होत असल्याचे समजते.

टपाली मतदानामध्ये वाढ
टपालाद्वारे होणाºया मतदानाचे (पोस्टल बॅलेट) प्रमाण या वेळी वाढले आहे. नेहमीपेक्षा जास्त पोलीस कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान केले आहे. अनेकांनी टपालाद्वारे मतदान केले आहे.
लष्करातील सीमेवर तैनात सैनिकांनी टपालाद्वारे केलेल्या मतदानाची मतमोजणी करण्यास क्यूआर कोड स्कॅन करावा लागतो व त्यानंतर त्याची मोजणी केली जाते. या प्रक्रियेला सरासरी एक मिनिटाचा अवधी लागतो. त्यामुळे ज्या मतदारसंघात सैनिकांच्या मतदानाची संख्या अधिक आहे त्या ठिकाणी मतमोजणीला अधिक वेळ लागण्याची शक्यता असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाºयांनी दिली.

Web Title:  Lok Sabha polling due to VVPAT verification will delay three hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.