Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविल्याचा दावा करत महाराष्ट्र क्रांती सेनेने दिला महायुतीला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 14:04 IST

मराठा समाजाला आरक्षण ही संघटनेची मूळ मागणी होती. हा प्रश्न राज्य सरकारने सोडविला आहे. त्यामुळे क्रांती सेना निवडणूक लढविणार नाही आणि महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देईल, अशी घोषणा अध्यक्ष सुरेश पाटील यांनी केली.

मुंबई - राज्य सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले आहे. न्यायालयाकडून या निर्णयावर अद्याप स्थगिती आली नसल्याने आरक्षण कायम टिकणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र क्रांती सेना रविवारी महायुतीत सहभागी झाली. शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील औपचारिक कार्यक्रमात क्रांती सेनेने महायुतीला पाठिंबा जाहीर केला.

महाराष्ट्र क्रांती सेना महाराष्ट्रात १५ लोकसभेच्या जागांवर निवडणूक लढवणार होती. मात्र, मराठा समाजाला आरक्षण ही संघटनेची मूळ मागणी होती. हा प्रश्न राज्य सरकारने सोडविला आहे. त्यामुळे क्रांती सेना निवडणूक लढविणार नाही आणि महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देईल, अशी घोषणा अध्यक्ष सुरेश पाटील यांनी केली.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं हा उद्देश ठेऊन महाराष्ट्र क्रांती सेनेची स्थापना करण्यात आली होती. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण मिळवून दिलं. या आरक्षणाला न्यायालयाकडून स्थगिती अद्याप आली नाही त्यामुळे हे आरक्षण कायम टिकणार आहे. याबाबी लक्षात घेता महाराष्ट्र क्रांती सेना महायुतीत सहभागी होत असल्याची घोषणा महाराष्ट्र क्रांती सेना अध्यक्ष सुरेश पाटील यांनी केली.

यावेळी जिथ जिथं महाराष्ट्र क्रांती सेनेने उमेदवार उभे केले होते, तिथून उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येतील. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपा युतीला पाठिंबा देण्याची भूमिका महाराष्ट्र क्रांती सेनेने घेतली आहे. विनोद तावडे  दिवाकर रावते आणि प्रविण दरेकर यांनी महाराष्ट्रातल्या समाजासाठी काहीतरी ठोस करण्यासाठी आम्हाला शक्ती  मिळाली असल्याचं या कार्यक्रमादरम्यान सांगितले. मराठा समाजाला मिळवून दिलेलं आरक्षण हे कायद्याच्या कसोटीत टिकणारं आहे. त्यामुळे यापुढेही ते टिकेल आमचा शब्द फिरणार नाही, जो शब्द दिलाय तो कायम राहील असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी मराठा समाजाला दिलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र क्रांती सेनेला एक पत्र दिलं आहे. ते विनोद तावडे आणि दिवाकर रावते यांनी वाचून दाखवलं.मराठा समाजाला कायम पाठिंबा असेल, मराठा समाजाच्या पाठीशी पक्ष कायम राहील असा पत्रात उलेख आहे अशी माहिती महाराष्ट्र क्रांती सेनेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली. तसेच आम्ही आमच्या आरक्षणासाठी मदत करणाऱ्या सरकारला पाठिंबा दिलाय असं सांगत गरज पडल्यास समाजासोबत सरकारच्या विरोधात जाण्यासही तयार आहे असा इशाराही भाषणातून दिला.

टॅग्स :लोकसभा निवडणूकभाजपाशिवसेना