Join us  

युवासेनेची नाराजी दूर करण्यासाठी पूनम महाजन 'मातोश्री'च्या दारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 1:51 PM

ऐन निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांची नाराजी महागात पडू शकते त्यामुळे भाजपाच्या पूनम महाजन यांनी मातोश्रीचे दार ठोकावले आहे. जोपर्यंत पुनम महाजन चूक मान्य करत नाही तोपर्यंत प्रचारावर बहिष्काराचा निर्णय युवासेनेने घेतला आहे

मुंबई - ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघावरुन शिवसैनिकांच्या मनात भाजपाच्या किरीट सोमय्यांवर आधीच राग असताना यात आणखी भर पडलीय ती म्हणजे उत्तर मध्य मुंबईच्या भाजपा-शिवसेना युतीच्या उमेदवार पूनम महाजन यांची. त्याचं कारण असं आहे की, उत्तर मध्य मुंबईमध्ये निवडणूक प्रचारासाठी छापण्यात आलेल्या पोस्टर्सवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा फोटो वगळण्यात आला. आदित्य ठाकरेंचा फोटो नसल्याने युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत पूनम महाजन यांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका घेतल्याने पूनम महाजन चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. 

त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांची नाराजी महागात पडू शकते त्यामुळे भाजपाच्या पूनम महाजन यांनी मातोश्रीचे दार ठोकावले आहे. जोपर्यंत पुनम महाजन चूक मान्य करत नाही तोपर्यंत प्रचारावर बहिष्काराचा निर्णय युवासेनेने घेतला आहे. त्यामुळे युवासैनिकांची नाराजी दूर करण्यासाठी पुनम महाजन यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. 

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात पूनम महाजन यांनी महायुतीच्या नेत्यांचे जे बॅनर लावले होते, त्यात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा फोटो लावला नव्हता. त्यामुळे युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी वांद्रे येथील शिवसेना शाखेत पूनम महाजन यांचा निषेध करणारी बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये युवासेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. “आदित्य ठाकरे हे युथ आयकॉन आहेत, युवकांचे आशास्थान आहेत, त्यांचा अपमान हा आम्हा शिवसैनिकांचा अपमान आहे. त्यामुळे पूनम महाजन यांनी आदित्य ठाकरेंना डावलल्याचा निषेध करत असल्याचं युवासेनेकडून सांगण्यात आलं. 

तसेच जोपर्यंत पूनम महाजन आपली चूक मान्य करत नाही, तोपर्यंत भाजपच्या प्रचारावर बहिष्कार टाकण्याचीही भूमिका युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली असल्याची माहिती युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी दिली. याआधीच किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीवरुन शिवसैनिक भाजपाविरोधात आक्रमक होताना दिसत असतानाच पूनम महाजन यांच्या प्रकरणावरुन युतीत नेत्यांचे मनोमिलन झाले मात्र कार्यकर्त्यांमध्ये एकी नसल्याचं चित्र समोर येत आहे.  

टॅग्स :लोकसभा निवडणूकभाजपापूनम महाजनउद्धव ठाकरेमुंबई उत्तर मध्य