Join us  

शिवसेना-भाजपात वादाची ठिणगी; "आनंदराव अडसूळांनी नको त्या विषयात हात घालू नये, अन्यथा..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 4:03 PM

Loksabha Election - मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात गजानन किर्तीकरांचे चिरंजीव अमोल किर्तीकर हे ठाकरे गटाकडून रिंगणात होते. या निवडणुकीत गजानन किर्तीकरांनी मुलाला मदत केल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. त्यावरून किर्तीकरांच्या बचावाला आनंदराव अडसूळ समोर आले आहेत. 

मुंबई - गजानन किर्तीकर यांच्यावरील आरोपानंतर आता शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ हे पुढे आले आहेत. अडसूळ यांनी भाजपा नेते आशिष शेलार आणि प्रविण दरेकरांना सुनावलं आहे. जर आम्ही बोलायला लागलो तर धुवून काढू असा इशारा अडसूळ यांनी भाजपा नेत्यांना दिला आहे. त्यामुळे मतदान संपल्यानंतर भाजपा-शिवसेनेतील हा वाद उफाळून आला आहे. त्यावर प्रविण दरेकरांनीही अडसूळांना नको त्या विषयात हात घालू नका असा पलटवार केला आहे. 

प्रविण दरेकर म्हणाले की, गजानन किर्तीकर आणि आनंदराव अडसूळ हे ज्येष्ठ नेते आहेत. ज्यांना राजकारणाचा प्रगल्भ अनुभव आहे त्यांनी एका पक्षात राहून संशयास्पद भूमिका घेणे हे योग्य नाही. आनंदराव अडसूळ यांनी खूप आहे ते बोलून दाखवावं, त्यांचं काय आहे हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. अडसूळांनी नको त्या विषयात हात घालू नये नाहीतर त्यांना त्रासाचं होईल असं त्यांनी सांगितलं आहे. 

काय म्हणाले आनंदराव अडसूळ?

गजानन किर्तीकर हे मोठे नेते आहेत. स्थानिक लोकाधिकारी समितीच्या माध्यमातून त्यांनी चळवळीत काम केले आहे. त्यांच्याबाबत बोलताना प्रवीण दरेकर हे भाजपाचे जबाबदार नेते आहेत त्यांनी अशाप्रकारे कट रचला होता वैगेरे बोलणं आम्हाला पसंत नाही. मुलगा लढत असेल तर मी उभं राहणार नाही असं किर्तीकर म्हणाले होते. त्यामुळे तुमच्याकडे पुरावा काय, किर्तीकर उमेदवारी अर्ज भरून मागे घेणार होते?, महायुतीच्या घटक पक्षाचे तुम्ही एक नेते आहात. तुम्ही असं बोलला तर बाकी लोक काय बोलतील? विनापुरावे अशी भाषा वापरणं हे चुकीचे आहे असं अडसूळांनी म्हटलं होतं. 

त्याशिवाय आशिष शेलारांनीही पुरावे द्यायला हवेत. आम्हीही भाजपा नेत्यांवर कारवाई करा असं बोलू शकतो. आमच्याकडेही अनेक मुद्दे आहेत. आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांच्याकडून आम्हाला काय काय त्रास झाला हे आम्ही सांगू शकतो.  कशाप्रकारे आश्वासने देतात, काय वागणूक देतात हे आम्हाला माहिती आहे. या लोकांनी बोलणं गरजेचे नाही. जर आम्ही बोललो तर धुवून काढू. गजानन किर्तीकर असो अडसूळ आम्ही बोलू. जाणुनबुजून कारवाई करणार असाल तर ते सहन करणार नाही. जर कारवाई झाली तर आम्हीही विचार करू असं विधान आनंदराव अडसूळ यांनी केले. 

गजानन किर्तीकरांच्या 'या' विधानावरून वाद

अमोलचं बोट धरुन मी त्याला शिवसेनेत आणलं नाही, तो कष्ट करुन आला आहे. अमोल प्रमाणिक आहे त्याला कोणतही व्यसन नाही, बाकीच्यांची मुल जशी राजकारणात पुढे पुढे करतात तशी त्याची वृत्ती नाही. तो साधासुधा आहे. त्याने एवढं काम करुन त्याला कधी नगरसेवकाची उमेदवारी मिळाली नाही. शिवसेना भाजपाची अचानकपणे युती तुटली तेव्हा त्याला कांदिवली विधानसभेत उमेदवारी दिली. पक्षात राजकारणात पुढे जायला पाहिजे होते तशी त्याला पक्षात संधी मिळाली नाही. आता सुदैवाने त्याला संधी मिळाली. त्याच्या आयुष्यात तो टर्निंग पॉईंट आहे, ना नगरसेवक, ना आमदार डायरेक्ट खासदार  असं विधान गजानन किर्तीकर यांनी केलं होतं. 

टॅग्स :प्रवीण दरेकरआनंदराव अडसूळगजानन कीर्तीकरमुंबई उत्तर पश्चिमलोकसभा निवडणूक २०२४शिवसेनाभाजपामहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४