Join us  

मुंबई दक्षिण मतदारसंघात भाजपचा जोर ओसरला; शिंदेसेना जागा लढवीत असल्याने संथगतीने काम

By संतोष आंधळे | Published: April 26, 2024 10:29 AM

महायुतीतील घटक पक्ष शिंदेसेना लढविणार असल्याचे स्पष्ट झाल्याने भाजपच्या गोटात निरव शांतता पसरली.

संतोष आंधळे, मुंबई : हनुमान जयंतीचे औचित्य साधून दक्षिण मुंबईतील विविध नेत्यांनी विविध मंदिरांना भेटी दिल्या आणि त्याचवेळी ही जागा महायुतीतील घटक पक्ष शिंदेसेना लढविणार असल्याचे स्पष्ट झाल्याने भाजपच्या गोटात निरव शांतता पसरली. शिंदेसेनेकडून मिलिंद देवरा यांच्या विविध हालचाली सुरू झाल्या आहेत. तीन दिवसांपासून दक्षिण मुंबईतील भाजपच्या गोटात कमालीची शांतता पसरल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

मंत्री मंगलप्रभात लोढा किंवा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या दोघांना सुद्धा या जागेवरून उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याने दोघांनी काही दिवसांपासून झपाट्याने बैठकी आणि मेळाव्याचे आयोजन करण्यास सुरुवात केली होती. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासोबत सामान्य नागरिकांच्या समस्यांकडे सुद्धा दोघांनी लक्ष देण्यास सुरुवात केली होती. जनसामान्यांच्या भेटीगाठींवर जोर देण्यात आला होता. अशा उत्साही वातावरणात कार्यकर्ते सुद्धा जोमाने कामाला लागले  होते. 

बूथ प्रमुखावर भिस्त-

भाजपमध्ये सर्वच निवडणुकीत बूथ प्रमुखांवर विशेष काम करत असते. या मतदार संघात नियुक्ती केल्या होत्या. त्यांच्यासोबत ३० कार्यकर्त्यांची फळी काम करत होती. प्रभाग प्रमुख, महिला मोर्चा आणि युवा मोर्चा यासोबत दक्षिण मुंबई भाजपचे कार्यकर्ते गेली काही दिवस या मतदारसंघात अधिक मेहनत घेत होते. घरोघरी जाऊन सर्व माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले होते.

जागेबाबत चर्चा सुरूच-

याप्रकरणी मुंबई भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनी सांगितले की, आमची दक्षिण मुंबईच्या जागेबाबत चर्चा सुरू आहे. योग्यवेळी योग्य उमेदवाराची घोषणा केली जाईल. आमच्यात कुठलेही वाद नाहीत.

 हनुमान जयंतीनिमित्ताने काही नियोजित कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर मात्र कार्यकर्त्यांना कुठल्या पद्धतीने काम करायचे असे आदेश न मिळाल्यामुळे उत्साहावर विरजण पडले आहे. संथगतीने जाण्याचे संकेत कार्यकर्त्यांना मिळाले.

टॅग्स :मुंबईलोकसभा निवडणूक २०२४एकनाथ शिंदेभाजपा