Join us  

काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर

By यदू जोशी | Published: May 01, 2024 10:21 AM

एकमेकांवर कुरघोडी करण्यापेक्षा आपापले सुभे/जिल्हे सांभाळावेत, अशी रणनीती ठरविण्यात आली. एका जिल्ह्यातील नेत्याने दुसऱ्या जिल्ह्यात लुडबुड करू नये, असा संदेश गडबड करू शकतात अशा नेत्यांना दिल्लीवरूनच दिला गेला.

यदू जोशी

मुंबई : गटबाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या प्रदेश काँग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दिसत असलेले ऐक्य हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे. वर्षानुवर्षे एकमेकांविरुद्ध लढणारे, एकमेकांना पाडण्यासाठी ताकद खर्ची घालणारे नेते एकत्र आल्याचे चित्र दिसत आहे. एकमेकांना साथ देण्याचा हा पॅटर्न काँग्रेसमध्ये आला आहे आणि तो विधानसभेतही दिसेल, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केले.

एकमेकांवर कुरघोडी करण्यापेक्षा आपापले सुभे/जिल्हे सांभाळावेत, अशी रणनीती ठरविण्यात आली. एका जिल्ह्यातील नेत्याने दुसऱ्या जिल्ह्यात लुडबुड करू नये, असा संदेश गडबड करू शकतात अशा नेत्यांना दिल्लीवरूनच दिला गेला.

आपली सत्ता येऊ शकते हा विश्वास आम्ही नेते, कार्यकर्त्यांना दिला आणि अशावेळी गटबाजी बाजूला ठेवा, असे आवाहन केले. त्याचे चांगले परिणाम निकालात नक्कीच दिसतील, असे पटोले यांनी सांगितले.

नागपुरात ऐक्याचे आश्चर्य

नागपुरात माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी आणि नितीन राऊत हे बऱ्याच वर्षांनी खांद्याला खांदा लावून काम करताना दिसले. त्यामुळे नागपूरची काँग्रेस एकसंध असल्याचे दिसले,

• अमरावतीत माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचे नेतृत्व मान्य करत सगळे काँग्रेस नेते साथ-साथ दिसले.धुळ्यात शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेले जिल्हाध्यक्ष श्याम सणेर आता बच्छाव यांच्या प्रचारात आहेत, पण नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांची नाराजी कायम आहे.

कुठे काय आहे चित्र?

चंद्रपूरमध्ये उमेदवारीवरून आ. प्रतिभा धानोरकर आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते * विजय वडेट्टीवार यांच्यात काही दिवस वादंग रंगले. शेवटी धानोरकर यांना उमेदवारी मिळताच, वडेट्टीवार यांनी गडचिरोलीत पक्षाचे उमेदवार नामदेव किरसान यांच्यासाठी शक्ती पणाला लावली आणि आधीचे विसरून चंद्रपुरातही सभा घेतल्या.

● माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याने पक्षाला मोठा धक्का बसला, पण पक्षाने डॅमेज कंट्रोलही केले. लातूरमध्ये माजी मंत्री अमित देशमुख यांनी काँग्रेसची मोट बांधली, शिवाय आसपासच्या मतदारसंघांमध्येही त्यांनी लक्ष घातले आहे.

● नागपूर ग्रामीणमध्ये माजी मंत्री र सुनील केदार यांच्या आग्रहावरून श्यामकुमार बर्वे यांना पक्षाने उमेदवारी दिली. केदार आणि माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्यात फारसे सख्य नाही, पण यावेळी दोघे एकमेकांना आडवे गेले नाहीत. कोल्हापुरातील काँग्रेस माजी मंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वात एकवटली आहे.

• सांगलीत माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी बंडखोरी केली, पण त्यांच्यासोबत असलेले माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम हे उद्धवसेनेचे चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात उतरले. मुंबईत मिलिद देवरा पक्ष सोडून गेले, संजय निरूपम यांनी पक्षातील नेत्यांवर टीका केली, पण त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही.

टॅग्स :मुंबईकाँग्रेसलोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४