Join us  

भाजपामध्ये 'इनकमिंग' जोरात; गिरीश महाजनांनी सांगितली 'अंदर की बात'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 2:29 PM

पुढचा आठवडाभर रोजच वेगवेगळ्या नेत्यांचे भाजपाप्रवेश सुरू राहणार आहेत, असे संकेत गिरीश महाजन यांनी दिलेत.

मुंबईः लोकसभा निवडणूक जाहीर होताच भाजपामधील 'इनकमिंग' वाढल्याचं पाहायला मिळतंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला अन् राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. तो धुरळा खाली बसतो न बसतो, तोच आता रणजीतसिंह मोहिते-पाटील भाजपावासी झालेत. त्यांचं माढा मतदारसंघाचं तिकीटही पक्कं मानलं जातंय. या फोडाफोडीच्या राजकारणावरून भाजपावर टीकाही होतेय. परंतु, विजयासाठी नव्या लोकांना संधी द्यावी लागेल, असं सांगत भाजपाचे नेते, राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी या 'इनकमिंग'चं समर्थन केलं आहे. विजयाच्या प्रबळ दावेदारांना तिकिटाची ऑफर देऊन भाजपा त्यांना पक्षात घेत असल्याचंच त्यांनी सूचित केलं.

तसंच, पुढचा आठवडाभर रोजच वेगवेगळ्या नेत्यांचे भाजपाप्रवेश सुरू राहणार आहेत, असे संकेत गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेत. त्यामुळे आणखी कोण-कोण 'कमळा'चं फुल हाती घेणार, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आणखीही काही नेत्यांची मुलं भाजपाची वाट धरणार का, यावरून उलटसुलट चर्चा रंगली आहे.

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हे खरं तर शरद पवार याचे निष्ठावंत शिलेदार. सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघाला राष्ट्रवादीचा गड करण्याचं काम त्यांनी केलं. खुद्द शरद पवारही २००९ साली या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. परंतु, यावेळी सगळंच बिनसलं. शरद पवारांनी नातवासाठी - पार्थ पवारसाठी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. पण, विजयसिंह यांच्या चिरंजीवांना - रणजीतसिंहांना उमेदवारी द्यायला पक्षातून विरोध झाला. त्यामुळे रणजीतसिंहांनी आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून भाजपामध्ये प्रवेश करायचं ठरवलं. त्यांच्या या निर्णयाला विजयसिंह मोहिते-पाटील यांनीही पाठिंबा दिला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. 

टॅग्स :लोकसभा निवडणूकसुजय विखेविजयसिंह मोहिते-पाटीलभाजपा