लोढा डेव्हलपर्समध्ये ८५ कोटींचा घोटाळा; माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक; कंपनीच्या जमिनी विकल्या, १० जणांविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 06:22 IST2025-09-18T06:22:24+5:302025-09-18T06:22:55+5:30
लोढा डेव्हलपर्स लिमिटेडमध्ये हेड लायझन या पदावर कार्यरत असलेले मोनिल गाला यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला आहे. तक्रारीनुसार, राजेंद्र हे सप्टेंबर २०१३ ते १८ ऑगस्ट २०२५ दरम्यान कंपनीत संचालक पदावर कार्यरत होते.

लोढा डेव्हलपर्समध्ये ८५ कोटींचा घोटाळा; माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक; कंपनीच्या जमिनी विकल्या, १० जणांविरोधात गुन्हा
मुंबई : प्रसिद्ध रिअल इस्टेट कंपनी लोढा डेव्हलपर्स लिमिटेडमध्ये ८५ कोटींचा फसवणूक प्रकरणी कंपनीचे माजी संचालक राजेंद्र नरपतमल लोढा, त्यांचा मुलगा साहिल लोढासह १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने राजेंद्र लोढा यांना बुधवारी अटक केली असून, न्यायालयाने त्यांना २३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
लोढा डेव्हलपर्स लिमिटेडमध्ये हेड लायझन या पदावर कार्यरत असलेले मोनिल गाला यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला आहे. तक्रारीनुसार, राजेंद्र हे सप्टेंबर २०१३ ते १८ ऑगस्ट २०२५ दरम्यान कंपनीत संचालक पदावर कार्यरत होते. त्यांनी भूमी अधिग्रहणाच्या अधिकारांचा गैरवापर करत कंपनीच्या मालकीच्या जमिनी अत्यल्प दरात विकल्या, तर काही जागा त्यांनी निकटवर्तीयांच्या नावे परत विकून कोट्यवधींचा फायदा मिळवला. कंपनीने त्यांना जमिनीचे संपादन करण्याच्या अधिकाराचा गैरवापर करत, विक्रीस परवानगी नसतानाही संगनमताने अनेक महत्त्वाच्या जमिनी, टीडीआर कमी दराने खासगी बिल्डरांना विकल्या, तक्रारीत म्हटले आहे.
२३ पर्यंत पोलिस कोठडी
राजेंद्र लोढा यांना अटक केली असून न्यायालयाने २३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी तपास सुरू असल्याचे उपायुक्त राज तिलक रोशन यांनी सांगितले.
तक्रारीत काय म्हटलेय?
तक्रारीनुसार, राजेंद्र लोढा यांनी भरत नरसाना, नितीन वडोर, रितेश नरसाना यांच्याशी संगनमत करून कंपनीच्या मालकीच्या जमिनी कमी दरात विकल्या.
तसेच राजाराम पाटील व नीलेश अग्रवाल यांच्याकडे जमीन नसतानाही त्यांच्या नावाने खोटा ताबा दाखवून कंपनीकडून रक्कम व फ्लॅट मिळवले.
कंपनीचे कर्मचारी निशा मेनन, नेहा देसाई, अमित कांबळे तसेच विक्रेता सुजितकुमार जीतप्रताप सिंग व विनोद पाटील यांनी या व्यवहारात सहकार्य करून कंपनीची फसवणूक केली आहे. यामुळे कंपनीचे सुमारे ८५ कोटींचे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय, तक्रारदारांनी पोलिसांना सादर केलेल्या पुराव्यांमध्ये पॉवर ऑफ ॲटर्नी, विविध करारनामे, ७/१२ उतारे, ई-मेल्स आणि आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे दिली.