Join us  

लॉकडाऊन, वर्क फ्रॉम होममुळे इंटरनेट वापरात होतेय मोठ्या प्रमाणात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 1:44 AM

वेग कमी झाल्याच्या तक्रारीत वाढ

मुंबई : कोरोना मुळे लॉकडाऊन झाल्याने व अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची परवानगी दिल्याने इंटरनेटच्या वापरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे इंटरनेट सेवेवरील ताण वाढला असल्याने अनेक ठिकाणी इंटरनेटचा वेग कमी झाल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.

लॉकडाऊनमध्ये नागरिकांना घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. त्यामुळे घरात अडकलेल्या नागरिकांनी इटंरनेटवर विरंगुळा शोधण्यास प्रारंभ केला आहे. अनेक चित्रपटे डाऊनलोड करणे, गाणी डाऊनलोड करणे, विविध आॅनलाइन गेम्स खेळणे यामध्ये मोठी वाढ झाली आहे. परिणामी नेहमीच्या तुलनेत इंटरनेटचा वापर वाढला आहे.

प्रत्यक्ष भेट घेणे शक्य नसल्याने नातेवाईकांसोबत व्हिडिओ कॉलने संपर्क साधला जात आहे. त्याशिवाय वर्क फ्रॉम होम चा पर्याय मिळालेल्या नोकरदारांना आपापले कार्यालयीन काम आॅनलाइन माध्यमातून करावे लागत आहे. तरुण वर्गामध्ये आॅनलाइन गेम खेळण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. विविध दूरसंचार कंपन्यांनी इंटरनेट प्लँनमध्ये वाढ केली असली तरी दिवसभर मोकळा वेळ हाती असलेल्या नागरिकांकडून इंटरनेटचा जणू फडशा पाडला जात आहे.

त्यातच दुसरी बाब म्हणजे एकाच वेळी अनेकांकडून इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर वापर केल जात असल्याने त्याच्या वेगात घट झाली आहे. इंटरनेटच्या वेगात घट झाल्याच्या तक्रारी मोठ्या संख्येने केल्या जात आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे या वाढत्या तक्रारींकडे लक्ष देणे व सर्व तक्रारदारांपर्यंत पोचणे इंटरनेट सेवा पुरवठादारांना शक्य होत नसल्याने ग्राहकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

मनोरंजनाच्या कार्यक्रमाकडे तरूणाईचा कल

च्ओव्हर द टॉप (ओटीटी ) वर मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्यास तरुणाईचा कल आहे. त्यामध्ये हाय डेफिनेशन (एचडी) दर्जा असल्याने त्याचा जास्त वापर केला जात आहे. च्शिव केबल सेनेचे राजू पाटील म्हणाले, सध्या ग्राहकांचा मोठा भर इंटरनेट वापरावर असल्याने इंटरनेटचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे केबल द्वारे पुरवण्यात आलेल्या इंटरनेट सेवेवर देखील त्याचा परिणाम झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्याइंटरनेट