Join us
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन : रमजान असतानाही मौलाना-हाफिजी समोर आर्थिक संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 18:27 IST

मागणी नसल्याने रोजगार नाही

 

खलील गिरकर

मुंबई : मुस्लिम बांधवांचा अत्यंत महत्त्वाचा रमजान महिना शुक्रवारी सायंकाळी चंद्रदर्शनानंतर सुरु झाला. शनिवारी देशभरात पहिला रोजा पाळण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊन मुळे सर्व धार्मिक स्थळांवरील प्रार्थना बंद करण्यात आली आहे. त्याप्रमाणे मशीदीमधील सामूहिकपणे अदा करण्यात येणाऱ्या नमाज वर देखील प्रतिबंध लादण्यात आले आहेत. मुस्लिम बांधवांनी सर्व नमाज घरी व्यक्तिगतरित्या अदा करावी, मशीदीमध्ये येऊन सामूहिकपणे नमाज अदा करण्यात येऊ नये असे निर्देश देण्यात आले आहेत व त्याप्रमाणे सर्वत्र अंमलबजावणी सुरु आहे. रमजान महिना सुरु झाल्याने रात्री इशा च्या नमाज नंतर अदा करण्यात येणारी तरावीह नमाज देखील नागरिकांना घरी अदा करावी लागत आहे. त्यामुळे तरावीह नमाज अदा करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या हाफिज असणाऱ्यांची मागणी यंदा ठप्प झाली आहे त्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.  

इस्लामी धर्मग्रंथ कुराण तोंडपाठ असणाऱ्या मौलवींना कुराण हाफिज असे संबोधले जाते. रमजान महिन्यात अदा करण्यात येणाऱ्या तरावीह या विशेष नमाज साठी मुस्लिम बांधवांना नमाज अदा करण्यासाठी कुराण मुखोद्गत असलेले हे हाफिज आवश्यक असतात. एखाद्या वेळी संदर्भ चुकु नये यासाठी एका वेळी किमान दोन हाफिज नमाज अदा करताना मशीदीमध्ये असतात. इस्लामी कॅलेंडरनुसार रमजान हा अत्यंत पवित्र व इतर महिन्यांच्या तुलनेत अत्यंत महत्त्वाचा महिना आहे.या महिन्यात देशभरातील गावाखेड्यातील मशीदींमध्ये देखील या हाफिजींना अत्यंत मोठी मागणी असते. मात्र यंदा रमजान महिना सुरु झालेला असताना कोरोनावर विजय मिळवण्यासाठी लॉकडाऊन सुरु असल्याने मशीदींमधील सामूहिक नमाज पूर्णतः बंद झाली आहे. केवळ मशीदीमधील अझान देणारी व्यक्ती व कमाल तीन व्यक्ती मशीदीत नमाज अदा करत आहेत. त्यामुळे ज्यावेळी या हाफिज ना सर्वात जास्त मागणी असते नेमके त्याच वेळी त्यांना अजिबात मागणी नसल्याने त्यांच्यासमोर रोजगाराचे संकट उभे ठाकले आहे. रमजान महिन्यात तरावीह साठी नेमलेल्या हाफिज ना रमजान ईदच्या दिवशी मशीदीच्या व्यवस्थापनाकडून मानधन व इतर नागरिकांकडून  ईदी दिली जाते मात्र यंदा तरावीहची नमाज घरातच व्यक्तिगतरित्या अदा केली जात असल्याने त्यांच्यासमोर सामूहिक नमाज अदा करण्यास न मिळाल्याने मानसिक असमाधानासोबत रोजगाराचे  संकट देखील उभे ठाकले आहे.

गरीब नवाज मद्रसाचे मौलाना अल्ताफ, मौलाना अब्दुल रहीम, जमैतुल उलेमा ए हिंदचे हाफिज अय्यूब खान यांनी या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. दरवर्षी मोठ्या प्रमाणात हाफिजींना मागणी असते मात्र यंदा मशीदीच्या विश्वस्तांकडून बोलावणे आले नाही. या संकटसमयी समाजाच्या सर्व स्तरातील व्यक्तींना मदत केली जात आहे. हाफिज असलेल्या व्यक्तींकडून वर्षभर धार्मिक कार्य केले जाते याची दखल घेऊन त्यांना पुरेसे रेशन, महिन्याचे वेतन देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. मद्रसा मोईनिया अश्रफियाचे प्रमुख मौलाना मोईनुद्दीन अश्रफ म्हणाले, या हाफिजींची काळजी घेणे समाजातील सर्वांचे कर्तव्य आहे. रमजान महिन्यात त्यांना दुप्पट वेतन दिले जाते यंदा दुप्पट वेतन दिले नाही तरी किमान नियमित वेतन मिळेल याची काळजी सर्वांनी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. रझा अकादमी तर्फे, जमैतुल उलेमा तर्फे विविध मशीदीतील मौलाना व त्यांच्या कुटुंबियांना रेशन कीट वाटप करण्यात आले. मात्र समाजातील सर्वसामान्य नागरिकांकडून देखील त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे यावा असे आवाहन केले जात आहे. 

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस