Join us  

लॉकडाऊन मध्ये गोराई गावातील नागरिक वळले शेतीकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 5:35 PM

मुंबईत आणि शेती होते हे तसे आश्चर्यकारक आहे.

मनोहर कुंभेजकर

मुंबई : मुंबईत आणि शेती होते हे तसे आश्चर्यकारक आहे. मात्र मुंबई महानगर पालिकेच्या हद्दीत असलेल्या व बोरिवली पश्चिम गोराई खाडीपलीकडे सुमारे 3 किमी अंतरावर गोराई गाव आहे. आजही येथे बेस्टची सुविधा नसून येथील नागरिक मिरा भाईंदर पालिकेच्या बसने भाईंदर,मनोरी,गोराई जेट्टी असा प्रवास करतात. तर येथील गोराई ते गोराई खाडी अशी गोराई मच्छिमार सहकारी सोसायटीची फेरीबोट सेवा देखिल पहाटे ते मध्यरात्री पर्यंत कार्यरत आहे.

सुमारे 17 ते 18 हजार लोकवस्तीच्या आणि 5 किमी परिसराचा समावेश असलेल्या यागावाने आजही आपले गावपण जपले आहे. मासेमारी आणि शेती व पर्यंटन हा या गावचा प्रमुख व्यवसाय.मात्र कोरोनामुळे येथील मासेमारी व हॉटेल व्यवसाय बंदच आहे.पूर्वी येथील तरुणांनी आपल्या शेतीच्या ठिकाणी पर्यटकांसाठी हॉटेल व्यवसाय सुरू केला.मात्र कोरोनाच्या महामारीमुळे येथील नागरिकांचा हॉटेल व्यवसाय बंद झाला असून नेहमी असणारी पर्यटकांची गर्दी आज कोरोनामुळे येथे नजरेस पडत नाही.त्यामुळे रोजगारसाठी पूर्वीप्रमाणे हातात नांगर घेत येथील नागरिक व तरुणाई पुन्हा शेतीकडे वळली आहे. आजही येथील 60 कुटुंब शेती करतात.

 गोराईकरांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि नागरिकांची कोरोना बद्धल असलेली भिती दूर करण्यासाठी उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी सोशल डिस्टनसिंगचे पालन करत चक्क ट्रॅक्टर चालवत पाहिले  चिखल केला. मग चिखलात त्यांनी चक्क रोपट्यांची लागवड देखिल केली आणि रोज दैनंदिन कामात व्यस्त असलेल्या या खासदाराने चक्क शेती करण्याचा आनंद लुटला. यावेळी येथील चर्चचे फादर एडवर्ड जसिंतो,माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी,योगेश कदम,डेसमंड गुडींनो,पीटर गुडींनो आदी मान्यवर उपस्थित होते. पावसाळ्यात येथे प्रामुख्याने भात शेती चालते. तर साधारणपणे येथील शेतकरी ऑक्टोबर पासून विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड करतात. आणि येथील भाज्यांना बोरिवली, मालाड व भाईंदर भाजी मंडईत चांगली मागणी आहे अशी माहिती गोराई रिसॉर्ट असोसिएशनचे अध्यक्ष जोरम राजा कोळी यांनी लोकमतला दिली. येथील शेतकरी हे पिढ्यांपिढ्या शेती करतात.आम्ही मुंबईत राहात असल्याने मात्र सात बारा व प्रॉपर्टी कार्डमध्ये  आमच्या येथील सुमारे 200 शेतकऱ्यांचा शेतकरी म्हणून उल्लेख आहे.मात्र मुंबईत कुठे शेती चालते असा सवाल  बोरिवली तहसिलदार करतात.

लॉकडाऊनमध्ये आमच्या गोरईकरांची भाजी मोठ्या प्रमाणात सडून गेली. आम्हाला इतर शेतकऱ्यांनाप्रमाणे शासनाकडून नुकसान भरपाई आणि शेतकरी म्हणून अन्य फायदे मिळत नाही अशी खंत व्यक्त करून शासनाने शेतकरी म्हणून सुविधा उपलब्ध करून घ्याव्या अशी मागणी शेवटी जोरम राजा कोळी यांनी व्यक्त केली.

टॅग्स :लॉकडाऊन अनलॉककोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना सकारात्मक बातम्या