नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 09:56 IST2025-12-29T09:55:42+5:302025-12-29T09:56:03+5:30
या अंतर्गत विद्यमान पायाभूत सुविधांचा विस्तार, नवे मेगा टर्मिनस, प्लॅटफॉर्म वाढ, अतिरिक्त मार्गिका आणि सिग्नल यंत्रणेचे अद्ययावतीकरण करण्यात येत आहे.

नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेवर येत्या २०३० पर्यंत तब्बल ७४९ नव्या लोकल फेऱ्या आणि १३३ मेल-एक्स्प्रेस गाड्या सुरू होणार आहेत. त्यामुळे लोकल प्रवास अधिक वेगवान होणार आहे. रेल्वे क्षमता वाढवण्याच्या राष्ट्रीय पातळीवरील योजनेअंतर्गत ही वाढ करण्यात येत असून, त्यामुळे मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास अधिक सुकर व सुरक्षित होईल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.
केंद्र सरकारने मुंबईसह ४८ प्रमुख शहरांमध्ये रेल्वे वहन क्षमता दुप्पट करण्याची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे.
या अंतर्गत विद्यमान पायाभूत सुविधांचा विस्तार, नवे मेगा टर्मिनस, प्लॅटफॉर्म वाढ, अतिरिक्त मार्गिका आणि सिग्नल यंत्रणेचे अद्ययावतीकरण करण्यात येत आहे.
तत्काळ, अल्पकालीन आणि दीर्घकालीन अशा तीन टप्प्यांत ही योजना राबवली जाणार आहे. नव्या गाड्या सुरू करण्यापूर्वी स्थानकांवरील प्रवासी क्षमतेत वाढ करण्यासाठी डेक उभारणी व अन्य सुविधा विकसित केल्या जात आहेत. अशा विविध सुविधांमुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर
होणार आहे.
मध्य रेल्वेवर काय होणार?
मध्य रेल्वेवर पनवेल-कळंबोली टर्मिनस, लोकमान्य टर्मिनस-२, कल्याण आणि मेगा परळ-टिळक टर्मिनस यांच्या उभारणीमुळे २२ फलाट आणि ३६ मार्गिका उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे ६८ नव्या मेल-एक्स्प्रेस गाड्या हाताळणे शक्य होईल, त्यात ३० गाड्यांच्या प्राथमिक देखभालीचा समावेश असेल. कल्याण यार्डातील कामे, १५ डब्यांसाठी प्लॅटफॉर्म विस्तार, कल्याण-कसारा आणि कल्याण-कर्जत तिसरी-चौथी मार्गिका तसेच पनवेल फलाट क्रमांक ४ची पुनर्बाधणी पूर्ण झाल्यानंतर ५८४ नव्या लोकल फेऱ्या सुरू करणार असल्याचे रेल्वे अधिकारी म्हणाले.
परेवर ७,०३३ कोटींचे प्रकल्प
पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल ते डहाणू रोडदरम्यान मार्गिकांचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारले जात आहे. विरार-डहाणू रोड तिसरी-चौथी मार्गिका, बोरिवली-विरार पाचवी-सहावी मार्गिका, मुंबई सेंट्रल-बोरिवली पाचवी-सहावी मार्गिका आणि नायगाव-जूचंद्र दुहेरी मार्गिका असे ७,०३३ कोटी रुपयांचे प्रकल्प राबविले जात आहेत.