Join us

मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत; एक्स्प्रेस गाड्याही रखडल्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 09:56 IST

सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांवर रेल्वे स्थानकावरच ताटकळत उभे राहण्याची वेळ आली आहे.

Mumbai Local: मध्य रेल्वेच्या कसारा ते कल्याण मार्गादरम्यानची लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने ही वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती आहे. परिणामी सदर भागातील लोकल स्थानकांवर सकाळपासून प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत असून ऑफिसला निघालेल्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कसार ते कल्याण यादरम्यानच्या रेल्वे रुळाच्या जवळच पोकलेन वापरून एक काम केले जात होते. मात्र या पोकलेनचा धक्का सिग्नल यंत्रणेच्या वायरला लागला आणि सिग्नल यंत्रणा बंद पडली. त्यामुळे या मार्गावरून मुंबईकडे येणाऱ्या सहा लोकल गाड्या अडकून पडल्या आहेत. त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांवर रेल्वे स्थानकावरच ताटकळत उभे राहण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, एक्स्प्रेस गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम झाला असून नाशिक मार्गाने मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांची वाहतूक ठप्प झाली आहे. सिग्नल यंत्रणा पूर्ववत झाल्यानंतरच लोकलसह एक्स्प्रेस गाड्या मुंबईच्या दिशेने सुटणार आहेत.  

टॅग्स :मुंबई लोकललोकलरेल्वे