मुंबईत मध्यरात्री तिघांनी धारदार शस्त्रांनी युवा क्रिकेटपटूची केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 13:03 IST2019-06-07T07:54:14+5:302019-06-07T13:03:55+5:30
भांडुपमध्ये काल मध्यरात्रीच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे.

मुंबईत मध्यरात्री तिघांनी धारदार शस्त्रांनी युवा क्रिकेटपटूची केली हत्या
मुंबईः भांडुपमध्ये काल मध्यरात्रीच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे. भांडुपमधला युवा क्रिकेटपटू राकेश पवार याची अज्ञातांकडून हत्या करण्यात आली आहे. महावीर पेट्रोल पंपाजवळ राकेश आला असता, दबा धरून बसलेल्या तीन आरोपींनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात राकेशचा मृत्यू झाला. राकेश पनवार हा विवाहित असून, त्याला दोन मुलंदेखील आहेत. राकेशची हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Maharashtra: A local cricketer Rakesh Panwar was stabbed to death by three unknown assailants in Bhandup, Mumbai, last night. Police investigation underway. pic.twitter.com/8C1aoCKgLb
— ANI (@ANI) June 7, 2019
राकेश पवार हा पेशानं क्रिकेटर असून, तो जिल्हास्तरावर क्रिकेट खेळतो. तसेच तो लहान मुलांना क्रिकेटचं प्रशिक्षणही देतो. भांडुपमधल्या एलबीएस रोडवरील महावीर पेट्रोल पंपावर राकेश मैत्रिणीबरोबर बाइकमध्ये पेट्रोल भरण्यासाठी आला होता. त्याच दरम्यान तीन आरोपींनी जुन्या भांडणाचा मनात राग धरून लोखंडी सुऱ्यानं वार करून राकेशला ठार मारले.
या हत्येप्रकरणी देवेंद्र पांडे यांनी तक्रार नोंदवली असून, भादंवि कलम 302, 506(2), 34 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राकेशची हत्या झाल्यानं त्याची मैत्रीणही संशयाच्या भोवऱ्यात अडकली. पोलिसांनी राकेशच्या त्या मैत्रिणीला ताब्यात घेतलं आहे. तर हत्या करणारे तिघे फरार झाले आहेत.