Join us
Daily Top 2Weekly Top 5

BMC Election Results 2026: स्थानिक, जातीय, प्रांतीय समीकरणांनी बजावली मुंबई महापालिकेच्या निकालात महत्त्वाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 08:20 IST

BMC Election Results 2026: दादर, माहीम, वरळी, शिवडी, भायखळा येथे उद्धवसेनेच्या उमेदवारांना यश, अल्पसंख्याक समाजाची मते काँग्रेस, एमआयएममध्ये विभागली

मुंबई : मुंबई महापालिकेच्या २२७जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप व शिंदेसेना युती सत्तेच्या बहुमताजवळ पोहोचली आहे. दुसरीकडे पक्षातील फूट व बंडखोरीनंतरही उद्धव ठाकरे यांनी मुंबईत करिष्मा कायम ठेवला आहे. मराठीबहुल अशा दादर, माहीम, वरळी, शिवडी, भायखळा मतदारसंघातील प्रभागात उद्धवसेनेच्या उमेदवारांना यश मिळाले आहे. तर, काँग्रेसनेही मुस्लिम भागात जोरदार मुसंडी मारल्याचे शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालामधून समोर आले आहे.

मुंबई शहरात ५६, पूर्व उपनगरात ६९ तर पश्चिम उपनगरात सर्वाधिक १०२ प्रभाग आहेत. महापालिकेची सत्ता कुणाच्या हाती द्यायची याचा निर्णय पश्चिम उपनगरावर अवलंबून आहे. मराठी, मुस्लिम, उत्तर भारतीय, गुजराती अशी मिश्र लोकवस्ती असल्याने येथे कुणा एका पक्षाचे वर्चस्व नाही. त्यामुळे शहर व पूर्व उपनगरातील विजयी संख्येवर मुंबई पालिकेची सत्ता अवलंबून आहे.

पश्चिम उपनगरातील प्राबल्य असलेल्या दहिसर, कांदिवली, चारकोप, गोरेगाव, अंधेरी, विलेपार्ले या मतदारसंघात भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले आहेत. शिवसेना पक्षफुटीनंतर येथील बहुसंख्य माजी नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. मात्र, या निवडणुकीत उद्धवसेनेने दुसरा क्रमांक घेतला असून शिंदेसेना मात्र तिसऱ्या स्थानी फेकली गेली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत सर्वच पक्ष आपले यश आणि अपयश याची कारणे शोधतील. त्यातून भविष्यात ते नवी रणनिती आखतील, अशी अपेक्षा आहे.

विशेष म्हणजे मराठी मतांचा कौल ठाकरे बंधूकडे असला तरी अन्य भाषिक मतदारांनी भाजपच्या झोळीत भरभरून दान टाकले आहे. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत मुंबईच्या प्रत्येक प्रभागातील जातीय आणि प्रांतीय समीकरणांनी निकालात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे दिसून आले आहे.

पूर्व उपनगरात एमआयएम

पूर्व उपनगरातील मुस्लिम प्रभागात काँग्रेस, एमआयएमच्या उमेदवारांनी विजय मिळविला आहे. मुलुंड विधानसभेच्या सहा प्रभागात भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.

तर, भांडुप, विक्रोळीमध्ये उद्धवसेनेने आपला दबदबा कायम राखला आहे. घाटकोपर पूर्व आणि पश्चिममध्ये मात्र भाजप व उद्धवसेनेला संमिश्र यश मिळाले आहे.

मुंबादेवी, भायखळा येथे काँग्रेसला यश

मुंबई शहरात कुलाबा, मलबार हिलमधील प्रभागात भाजप तर मुंबादेवी, भायखळा येथे काँग्रेस, उद्धवसेनेला यश मिळाले आहे. तर मराठीबहुल भागात मनसे, उद्धवसेनेचाच बोलबाला दिसून आला आहे.

या प्रस्थापितांना बसला धक्का ?

महापालिका निवडणुकीच्या रिंगणात प्रस्थापितांनी आपल्या मुला-मुलींनाही उतरविले होते. मात्र, जनमताने त्यांच्या बाजूने कौल दिला नाही.

समाधान सदा सरवणकर पक्ष : शिंदेसेना प्रभाग क्र.१९४

कप्तान मलिक पक्ष : राष्ट्रवादी (अजित पवार) प्रभाग क्र. १६५

जय मंगेश कुडाळकर पक्ष : शिंदेसेना प्रभाग क्र. १६९

गीता गवळी पक्ष: अखिल भारतीय सेना प्रभाग क. २१२ 

दीप्ती वायकर-पोतनीस पक्ष : शिंदेसेना प्रभाग क्र.७३

आता महापौर कोण ?

 महापालिका निवडणूक झाली, निकाल लागला आणि लगेचच मुंबईचा महापौर कोण होणार याबाबत चर्चा सुरू झाली. मुंबईत सर्वाधिक जागा जिंकणारा मोठा पक्ष भाजप असल्यामुळे महापालिकेत भाजप आणि शिंदेसेना सत्ता स्थापन करतील, असे एकूण राजकीय चित्र आहे. शिंदेसेनेला खूप कमी जागा मिळाल्याने महापौरपदावर शिंदेसेना दावा करणार नाही. त्यामुळे मुंबईचा महापौर हा भाजपचाच होण्याची शक्यता अधिक आहे. पक्षात याबाबत कुजबुज सुरू झाली असली तरी कळीचा मुद्दा 'आरक्षण' आहे. मुंबईच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत अद्याप काढण्यात आलेली नाही. यापूर्वी महापालिका निवडणुकीआधी महापौरपदाचे आरक्षण रोटेशन किंवा लॉटरी पद्धतीने निश्चित केले जात असे. मात्र, यावेळी असे काहीही करण्यात आलेले नाही. सामान्यतः महापालिका निवडणुकीपूर्वी किंवा प्रभाग रचनेदरम्यानच महापौरपदाचे आरक्षण जाहीर केले जाते. यामुळे कोणत्या प्रवर्गातील उमेदवाराला संधी मिळेल, हे स्पष्ट होत असे. मात्र, यावेळी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यात प्रामुख्याने दोन तांत्रिक मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. जुन्या रोटेशननुसार महापौरपदाचे आरक्षण काढले जाईल की झीरो रोस्टर करून आरक्षणाची नवीन पद्धतीने नव्याने सुरुवात केली जाईल, हेदेखील स्पष्ट करण्यात आलेले नाही.

मुद्दे ठरले निर्णायक?

 मुंबईकरांसाठीच मुंबईचे निर्णय व्हावेत, मराठी माणसाची नोकरी, व्यवसाय, शहरावरील त्यांचा हक्क कायम राहावा, हा प्रचाराचा केंद्रबिंदू ठरला. पालिकेत २५ वर्षाच्या  सत्तेत ठाकरेंनी परप्रांतीय ठेकेदारांना कंत्राट देऊन पैसे उकळले. कोविड काळात भ्रष्टाचार केला, असा प्रचार भाजप, शिंदेसेनेने केला.  कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो रेल, बीडीडी चाळ व धारावी पुनर्वसन, तसेच वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी विविध प्रकल्पांचे मुद्दे भाजपने मांडले.  पालिकेने कंत्राटांमधून मुंबई लुटली. पालिकेच्या ठेवी खर्च केल्या. मुंबईच्या जमिनी विकल्या, असा आरोप ठाकरे बंधूंकडून करण्यात आला. सत्तेत असताना केलेली विकासकामे, आरोग्य व्यवस्थापन, तसेच यापुढे पार्किंग, रस्ते व कर नियमांत बदल करण्याचे आश्वासन ठाकरेंनी दिले होते.

निकालाची वैशिष्ट्ये काय ? 

मुंबईत भाजप प्रथमच सर्वाधिक नगरसेवक असलेला पक्ष म्हणून पुढे आला आहे. गेल्या वेळेपेक्षा यावेळी भाजपला अधिक जागा मिळाल्या आहेत. एमआयएमसारख्या राजकीय पक्षाने ठराविक भागांत आपले वर्चस्व दाखवले आहे. विशेष म्हणजे या पक्षाला मुंबईत कोणतेही नेतृत्त्व नव्हते. कुलाबासारख्या उच्चभ्रू वस्तीतील २२६ या प्रभागात 'नोटा'ला १,४०४ मते मतदारांनी दिली. या प्रभागात केवळ दोन उमेदवार आमने-सामने होते. काही आमदार-खासदारांच्या घराणेशाहीला जनतेने नाकारले आहे. यामध्ये सत्ताधारी तसेच विरोधी पक्षाचे उमेदवार होते. तेथे नवे चेहरे निवडून आले. प्रभाग १७३ मध्ये भाजपच्या बंडखोर उमेदवार शिल्पा केळूसकर यांनी मित्रपक्षाच्या उमेदवाराचा पराभव करत बाजी मारली. ही लढत लक्षणीय ठरली.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Election 2026: Local Factors Shaped BMC Results

Web Summary : BJP, Shiv Sena alliance nears BMC majority. Thackeray's charisma endures. Congress gains in Muslim areas. Local, caste, and regional factors influenced results, with Marathi votes favoring Thackeray and other language voters backing BJP.
टॅग्स :महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६भाजपा