लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 13:32 IST2025-09-27T13:31:11+5:302025-09-27T13:32:51+5:30
एकत्र येऊन व्यवसाय करण्याची मिळणार संधी, महिला व बालविकास विभाग आणि मुंबई बँकेच्या संयुक्त विद्यमाने ही विशेष कर्ज योजना राबविण्यात येणार आहे.

लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
मुंबई - मुंबईत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना व्यवसायासाठी १० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे. मुंबई बँकेच्या माध्यमातून ही विशेष कर्ज योजना राबविण्यात येणार आहे. या कर्जाचे हप्ते शासनाकडून दरमहा मिळणाऱ्या दीड हजार रुपयांच्या मानधनातून वळते करण्यात येणार आहेत.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ यांच्या माध्यमातून वैयक्तिक व गट कर्ज व्याज परतावा योजनेच्या लाभार्थी महिलांना व्यवसायासाठी कर्ज दिले जाते. अनेकांना लाडकी बहीण योजनेंतर्गत दरमहा १,५०० रुपये मानधन मिळत आहे.
आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा उद्देश
मुंबई बँकेमध्ये १६.०७ लाख बचत खात्यांपैकी लाडकी बहीण योजनेंतर्गत ५३ हजार ३५७ महिलांची शून्य शिल्लक खाती उघडण्यात आली असून, त्यांच्या खात्यात दरमहा मानधनाची रक्कम जमा होत आहे. लाडकी बहीण योजनेचे मानधन जमा होत असलेल्या महिलांनी व्यवसाय करून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने ही योजना राबविली जाणार आहे.
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना आहे. महामंडळांनी मुंबई बँकेला प्राधिकृत करून तातडीने सामंजस्य करार करावा, असे निर्देश दिले आहेत. लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभ देण्यात येणार आहे. - आदिती तटकरे, महिला व बालविकासमंत्री
५-१० महिलांना एकत्रित व्यवसायाची संधी
लाडकी बहीण योजनेचे मानधन मिळत असल्याने महिलांना या योजनेत अपात्र ठरवता येणार नाही. एक लाख रुपयांपर्यंत कर्ज त्यांना मिळणार असून, ५ ते १० महिला एकत्र येऊन व्यवसाय करू शकतात. महिला व बालविकास विभाग आणि मुंबई बँकेच्या संयुक्त विद्यमाने ही विशेष कर्ज योजना राबविण्यात येणार आहे.