Join us
Daily Top 2Weekly Top 5

LMOTY 2026 : मुलांवर सोशल मीडियाचा विपरित प्रभाव; तो रोखण्यासाठी ठोस उपाय करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 06:06 IST

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका

मुंबई : १६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर कायदेशीर बंदी घालण्याचा राज्य सरकारचा सध्या कोणताही विचार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मात्र डिजिटल माध्यमांचा लहान मुलांच्या मानसिकतेवर आणि वागणुकीवर वाढत असलेला प्रभाव चिंतेचा विषय असल्याचे त्यांनी मान्य केले. या पार्श्वभूमीवर या प्रभावाला आळा घालण्यासाठी योग्य आणि परिणामकारक उपाययोजना करण्याचा विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. 

‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२६’ या सोहळ्यात अभिनेता आमिर खान यांच्याशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही भूमिका मांडली. या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेपासून युवकांच्या मानसिक आरोग्यापर्यंत अनेक मुद्द्यांवर मनमोकळेपणाने भूमिका मांडली. यावेळी त्यांनी इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही सोशल मीडियाच्या अति वापरावर काय उपयोजना करता येतील याबाबत सविस्तर भाष्य केले.

कर्नाटक व आंध्र प्रदेशसारख्या राज्यांनी १६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घातल्याचा संदर्भ देत आमिर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना महाराष्ट्र सरकार अशा प्रकारच्या बंदी घालणार का असा प्रश्न केला. त्यावर फडणवीस यांनी याबाबत ठोस विचार करावा लागेल असे म्हटले.

सोशल मीडियामुळे एकाग्रता कमी होतेय 

१. आपल्या देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या असा विचार सुरू आहे की, १६-१७ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर बंदी आणावी. या विषयावर आपल्याला काहीतरी ठोस आणि अंतिम विचार करावा लागेल. सोशल मीडियावर बंदी येणार की नाही, हे मी आताच स्पष्ट करत नाही. परंतु सोळा वर्षांखालील मुलांवर जो त्याचा विपरित परिणाम होत आहे, तो कसा थांबवता येईल यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सरकार या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

२. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे एआय अल्गोरिदमद्वारे ज्या गोष्टी आवडतात त्याच गोष्टी सतत दाखवतात. यामुळे हळूहळू तुमची विचारप्रक्रिया त्याच साच्यात तयार होऊ लागते. याचा दुसरा मोठा तोटा म्हणजे आपली एकाग्रतेची क्षमता कमी झाली आहे. अवघ्या ३० सेकंदांच्या रील्समुळे आता कोणालाही सविस्तर किंवा मोठी गोष्ट पाहण्यात रस राहिलेला नाही. वाचनाची आवड निर्माण करणे हे खरंच एक गंभीर आव्हान आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Social media's adverse impact on children; Strong measures to curb it.

Web Summary : Maharashtra government considers measures to curb social media's impact on children's mental health. CM Fadnavis, during Lokmat event with Aamir Khan, acknowledged concerns about declining concentration and the need for solutions, but no immediate ban is planned.
टॅग्स :देवेंद्र फडणवीससोशल मीडियालोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2026आमिर खान