छाप पाडणारे नेते! अतुल सावे, दीपक केसरकर ठरले 'इन्फ्लुएन्शियल राजकारणी'; 'लोकमत'च्या पुरस्काराने सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 07:23 PM2024-02-15T19:23:40+5:302024-02-15T19:24:09+5:30

आज मुंबईतील 'गेट वे ऑफ इंडिया' इथं झालेल्या भव्य सोहळ्यात या दोघांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान करण्यात आला.

LMOTY 2024: Leaders who make an impression! Atul Save, Deepak Kesarkar become 'Influential Politicians'; Honored with 'Lokmat' Award | छाप पाडणारे नेते! अतुल सावे, दीपक केसरकर ठरले 'इन्फ्लुएन्शियल राजकारणी'; 'लोकमत'च्या पुरस्काराने सन्मान

छाप पाडणारे नेते! अतुल सावे, दीपक केसरकर ठरले 'इन्फ्लुएन्शियल राजकारणी'; 'लोकमत'च्या पुरस्काराने सन्मान

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2024: महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि प्रतिष्ठेचा मानला जाणारा पुरस्कार सोहळा म्हणजे 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'. महाराष्ट्राच्या विकासासाठी भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींचा हा सन्मान सोहळा. लोकसेवा-समाजसेवा, कृषी, शिक्षण, प्रशासन, वैद्यकीय, उद्योग, राजकारण या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी पुरस्काराने गौरवण्यात येतं. यामधील, 'इन्फ्लूएन्शियल राजकारणी' या कॅटेगरीमध्ये यावर्षी दोन नेते पुरस्काराचे मानकरी ठरलेत. ते आहेत, राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर. आज मुंबईतील 'गेट वे ऑफ इंडिया' इथं झालेल्या भव्य सोहळ्यात या दोघांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

राजकारण (इन्फ्लुएन्शियल) या कॅटेगरीसाठी यावर्षी खासदार अमोल कोल्हे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, रवींद्र चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनाही नामांकन होतं. त्यातून 'सुपर ज्युरीं'नी दोघांची निवड केली. 

कोकणच्या लाल मातीशी नाळ जुळलेला माणूस!

शिक्षणमंत्री आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून २००९ पासून सातत्याने निवडून येत आहेत. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर शिवसेना पक्षातर्फे त्यांनी निवडणूक लढवली. अर्थ, ग्रामविकास, राज्यमंत्री अशी पदे भूषवलेल्या केसरकर यांच्याकडे आता शिक्षणासारखे महत्त्वाचे खाते सोपवले आहे. मुंबई शहराचे पालकमंत्रिपद केसरकर सांभाळत आहेत. कोकणातील आंबा उत्पादकांचे प्रश्न, वाहतुकीच्या समस्या, पर्यटन विकास याबाबत ते आग्रही भूमिका घेत आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट केल्यानंतर केसरकर यांनी त्यांना साथ दिली. प्रवक्तेपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळत, विरोधकांची टीका, हल्ले याला चोख प्रत्युत्तर दिले. 

संयमी, विकासाभिमुख नेतृत्व म्हणून नावलौकिक

राजकीय वारसा लाभलेले गृहनिर्माण तथा बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्या कार्यशैलीद्वारे एक वेगळा ठसा उमटवला आहे. वडील दिवंगत माजी खासदार मोरेश्वर सावे यांच्याकडून त्यांना राजकीय वारसा मिळाला. भाजपाचे शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, राज्य सरचिटणीस जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. २०१४ साली ते आमदार झाले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना उद्योग राज्यमंत्री म्हणून जबाबदारी दिली होती. तेव्हा त्यांनी पाणी पुरवठ्यासाठी नवी योजना व रस्त्यांसाठी मोठा निधी आणला. सध्या ते गृहनिर्माण व बहुजन कल्याण मत्री म्हणून सक्षमपणे काम करत आहेत. शेंद्रा, बिडकीन येथे मोठे उद्योग उभारणीसाठी प्रयत्न, मराठवाडा वॉटरग्रीडसाठी ते पाठपुरावा करत आहेत. 

पुरस्कार विजेते निवडणारे 'सुपर ज्युरी'

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराचे विजेते निवडणाऱ्या परीक्षक मंडळात यावर्षी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे, मुंबई पोलीस विशेष आयुक्त देवेन भारती, पद्मश्री सोनू निगम, एव्हेन्यू सुपरमार्ट्स लि. चे अध्यक्ष रमेश दमाणी, एमक्योर फार्मा लिमिमटेडच्या कार्यकारी संचालक नमिता थापर, शास्त्रीय गायक आणि राष्ट्रीय पुस्कार विजेते महेश काळे, नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर, इन्स्टिट्युट ऑफ गॅस्ट्रो सायन्स रिलायन्स हॉस्पिटलचे पद्मश्री अमित मायदेव, पद्मश्री पोपटराव पवार, बालकृष्ण इंडस्ट्रिज लि. चे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार, लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा, लोकमत मीडिया प्रा.लि.चे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा हे मान्यवर होते.
 

Web Title: LMOTY 2024: Leaders who make an impression! Atul Save, Deepak Kesarkar become 'Influential Politicians'; Honored with 'Lokmat' Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.