म्हाडाच्या घरांच्या लॉटरीचे थेट प्रक्षेपण, एसएमएसद्वारेही माहिती कळविली जाणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 20:19 IST2023-08-11T20:19:27+5:302023-08-11T20:19:44+5:30
वेबकास्टिंगची लिंक सोडतीच्या आदल्या दिवशी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल.

म्हाडाच्या घरांच्या लॉटरीचे थेट प्रक्षेपण, एसएमएसद्वारेही माहिती कळविली जाणार
मुंबई : म्हाडाच्या ४ हजार ८२ सदनिकांच्या विक्रीकरिता प्राप्त १ लाख २० हजार २४४ पात्र अर्जाची संगणकीय सोडत १४ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे काढण्यात येणार आहे. सोडतीसाठीची घरे अंधेरी, जुहु, गोरेगांव, कांदिवली, बोरीवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन येथे उभारण्यात आली आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सोडतीचे आयोजन करण्यात आले असून, सोडतीत सहभाग घेतलेल्या अर्जदारांची संख्या लक्षात घेता मंडळातर्फे व्यापक नियोजन करण्यात आले आहे. तसेच अर्जदारांना सोयीस्कररीत्या निकाल पाहता यावा याकरिता सभागृहाच्या आवारात व सभागृहात एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे. अर्जदारांना वेबकास्टिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण बघण्याची सुविधाही आहे.
वेबकास्टिंगची लिंक सोडतीच्या आदल्या दिवशी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल. सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टिंगद्वारे करण्यात येणार असल्याने नागरिकांना अल्पावधीतच सोडतीचा निकाल जाणून घेता येणार आहे. सोडतीमधील विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध केली जाणार असून विजेत्या अर्जदारांना एसएमएसद्वारेही विजेता ठरल्याबाबतची माहिती तात्काळ कळविली जाणार आहे. सोडतीत विजेता ठरल्यानंतर, अर्जदारास सूचना पत्र पाठविले जाणार असून त्यातील तरतुदींची पूर्तता केल्यानंतर विजेत्या अर्जदारांना तात्पुरते देकार पत्र पाठविले जाणार आहे.