म्हाडाच्या लॉटरीला लाभला अल्प प्रतिसाद; अर्ज भरणा प्रक्रियेत बदल, १९ पर्यंत मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 05:43 IST2023-04-10T05:43:07+5:302023-04-10T05:43:39+5:30
आतापर्यंत या सोडतीला म्हणावा तसा प्रतिसाद लाभलेला नाही.

म्हाडाच्या लॉटरीला लाभला अल्प प्रतिसाद; अर्ज भरणा प्रक्रियेत बदल, १९ पर्यंत मुदतवाढ
मुंबई :
म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर-जिल्हा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत ४,६४० सदनिका व १४ भूखंडांच्या विक्रीकरिता ऑनलाइन संगणकीय सोडत काढण्यात येणार असून, आतापर्यंत या सोडतीला म्हणावा तसा प्रतिसाद लाभलेला नाही. आतापर्यंत २९ हजार ३३० अर्ज दाखल झाले असून, १८ हजार ५० अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे. त्यामुळे अधिकाधिक अर्ज सादर करण्याकरिता १९ एप्रिल मुदतवाढ देण्यात आली आहे.
२१ एप्रिलच्या रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन व आरटीजीएस / एनइएफटीद्वारे अनामत रक्कम भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
अधिकाधिक अर्जदारांना अर्ज करता यावे, यासाठी सुविधा म्हणून नूतन संगणकीय प्रणालीतील अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेत वापरकर्त्यांना अनुकूलतेसाठी काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
सदनिका व भूखंड विक्रीसाठी ऑनलाइन संगणकीय सोडत १० मे रोजी सकाळी १० वाजता ठाणे येथील डॉ.काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे काढण्यात येणार आहे.
म्हाडाने अशी दिली सवलत
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे पीएमएवाय नोंदणी प्रमाणपत्र असणे बंधनकारक नाही.
प्रणालीत अपलोड केलेल्या आयकर परतावा प्रमाणपत्रातील माहितीबाबत चेक बॉक्समध्ये संमती घेतली जाणार.
विवाहानंतर नाव, आडनाव बदललेल्या महिला अर्जदारांना बदललेले नाव नमूद करून अर्ज नोंदणीकरिता येणार.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील विजेत्यांनी प्रथम सूचनापत्र जारी करण्याअगोदर सदनिका नाकारली, तर विजेत्यांची अनामत रक्कम परत करणार.