Join us  

काँग्रेसने स्टार प्रचारकांच्या यादीतून युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबेंना डावलले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 2:22 PM

काँग्रेसने देशातील 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, गुलाम नबी आझाद, ज्योतिरादित्य सिंदीया यांचा समावेश आहे.

मुंबई - लोकसभा निडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांची यादी काँग्रेसने प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, डॉ. मनमोहन सिंह यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. मात्र, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या नावाचा या यादीत समावेश नाही. त्यामुळे काँग्रेसमधील तरुणांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

काँग्रेसने देशातील 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, गुलाम नबी आझाद, ज्योतिरादित्य सिंदीया यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांचाही या यादीत समावेश आहे. मात्र, सोशल मीडिया आणि वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुनही काँग्रेसची भूमिका मांडणाऱ्या सत्यजीत तांबे यांना या स्टार प्रचाराच्या यादीतून वगळण्यात आले आहे. 

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुकीत सर्वाधिक मते घेत सत्यजीत तांबे यांची अध्यक्षपदी निवड झाली होती. महाराष्ट्रातील काँग्रेस विचारांची तरुणाई सत्यजीत तांबे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. तसेच सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या, काँग्रेसची बाजू मांडणाऱ्या तरुणाईलाही या यादीत त्यांचे नाव नसल्याने धक्का बसला आहे. दरम्यान, नुकतेच 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' तरुण राजकारणी या कॅटेगिरीतून लोकमत वृत्त समुहाच्यावतीने त्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. त्यानंतर, काँग्रेस विचारसरणीच्या तरुणांनी सत्यजीत तांबे यांचे कौतुकही केले होते. 

सत्यजीत तांबे हे काँग्रेस नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. तांबे यांनी 2014 साली अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. शिवाय त्यांनी दोनदा अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. तांबे गेल्या दीड दशकापासून युवक काँग्रेस आणि एनएसयूआयच्या माध्यमातून युवकांना संघटित करण्याचे काम करत आहेत. त्यांनी दोन वेळा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाचे काम पाहिले आहे. दरम्यान, याबाबत सत्यजीत तांबे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कुठलिही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. 

 

टॅग्स :सत्यजित तांबेकाँग्रेसलोकसभा निवडणूकपुणे