Lionel Messi Devendra Fadnavis Project Mahadeva Football: स्टार फुटबॉलर आणि फिफा विश्वचषक विजेता अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी याचा सध्या भारत दौरा सुरु आहे. रविवारी संध्याकाळी मेस्सीने मुंबईच्या वानखेडे मैदानावर हजेरी लावली. त्याची एक झलक पाहण्यासाठी फुटबॉलप्रेमींची तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारतर्फे 'प्रोजेक्ट महादेवा' हा राज्यस्तरीय क्रीडा उपक्रम अधिकृतपणे लाँच केला.
काय आहे प्रोजेक्ट महादेवा?
महाराष्ट्रभरातून जिल्हास्तरीय निवड चाचण्यांमधून निवडलेले १३ वर्षांखालील ६० प्रतिभावान फुटबॉलपटू यांना लिओनेल मेस्सी सोबत ४५ मिनिटांचे विशेष फुटबॉल प्रशिक्षण शिबिर आणि मार्गदर्शन सत्र मिळाले. ही संधी या खेळाडूंसाठी आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण ठरला. आजचा कार्यक्रम प्रोजेक्ट महादेवाचा शुभारंभ आणि निवड केलेल्या U-13 फुटबॉलपटूंसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शनाचा होता. या कार्यक्रमाला सचिन तेंडुलकर, भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्री, भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार राहल भेके, तसेच काही सेलिब्रिटीही उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीसांचं मेस्सीला 'प्रॉमिस'
नमस्कार मुंबई, गणपती बाप्पा मोरया... फुटबॉलमधला सर्वोत्कृष्ट खेळाडू मेस्सी यांचे स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की, तो आमच्या ६० युवा फुटबॉलपटूंना मार्गदर्शन करत आहे, जे २०३४ मध्ये फुटबॉलच्या मैदानावर आपले वर्चस्व गाजवणार आहेत. 'प्रोजेक्ट महादेवा'चा उद्देश आपल्या राज्यात फुटबॉलला केंद्रस्थानी आणणे हा आहे. आमच्या तरुण उदयोन्मुख खेळाडूंना मार्गदर्शन केल्याबद्दल मेस्सी यांचे खूप खूप आभार. मेस्सी, तुम्ही त्यांना प्रेरणा दिली आहे आणि मी तुम्हाला खात्री देतो की, या खेळाडूंपैकी एकतरी खेळाडू फिफा विश्वचषकात खेळताना तुम्हाला नक्कीच दिसेल. धन्यवाद आणि पुन्हा एकदा स्वागत," असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी मेस्सीसमोर बोलताना व्यक्त केला.
प्रोजेक्ट महादेवाचा दीर्घकालीन हेतू काय?
मिशन ऑलिम्पिक २०२६ अंतर्गत महाराष्ट्रातून अधिकाधिक सुवर्णपदके मिळवणे आणि २०३४ पर्यंत फुटबॉल विश्वचषकासाठी पात्र ठरणे व विजेतेपदाचे लक्ष्य ठेवणे हा 'प्रोजेक्ट महादेवा' राबवण्याचा मूळ हेतू आहे. या उपक्रमाअंतर्गत १३ ते १८ वयोगटातील खेळाडूंना शिस्तबद्ध प्रशिक्षण, योग्य मार्गदर्शन आणि जागतिक स्तरावरील संधी उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
प्रोजेक्ट महादेव हा उपक्रम महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA), व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन (VSTF), वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA), सिडको (CIDCO) आणि महाराष्ट्र शासनाचा क्रीडा विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने राबवण्यात येत आहे. या विविध संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे धोरणात्मक दिशा, तळागाळातील सहभाग, व्यावसायिक फुटबॉल कौशल्य, पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय पाठबळ मिळून राज्यात एक सक्षम आणि शाश्वत फुटबॉल विकास व्यवस्था उभी राहणार आहे.
Web Summary : Lionel Messi's Mumbai visit saw CM Fadnavis launch 'Project Mahadeva,' training young footballers. Fadnavis promised Messi one trainee would play in FIFA World Cup 2034, aiming to boost football in Maharashtra.
Web Summary : मुंबई में लियोनेल मेस्सी की यात्रा के दौरान सीएम फडणवीस ने युवा फुटबॉलरों को प्रशिक्षित करने के लिए 'प्रोजेक्ट महादेव' लॉन्च किया। फडणवीस ने मेस्सी से वादा किया कि एक प्रशिक्षु 2034 फीफा विश्व कप में खेलेगा, जिसका लक्ष्य महाराष्ट्र में फुटबॉल को बढ़ावा देना है।