हॉटेल सुरू ठेवण्याची मर्यादा, आम्ही जगायचे कसे : आहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:06 IST2021-07-17T04:06:52+5:302021-07-17T04:06:52+5:30
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात हॉटेल रेस्टॉरंटसाठी वेळेची मर्यादा आहे. सर्वात जास्त व्यवसाय होतो त्यावेळी हॉटेल बंद ठेवावे ...

हॉटेल सुरू ठेवण्याची मर्यादा, आम्ही जगायचे कसे : आहार
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात हॉटेल रेस्टॉरंटसाठी वेळेची मर्यादा आहे. सर्वात जास्त व्यवसाय होतो त्यावेळी हॉटेल बंद ठेवावे लागत असल्याने मोठे नुकसान होत आहे. तर दुसरीकडे सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत केली जात नाही, मग आम्ही जगायचे कसे? असा सवाल आहारने विचारला आहे.
याबाबत आहारचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी म्हणाले की, रेस्टोरंटमुळे प्रत्यक्ष ६० लाख जणांना रोजगार मिळतो. तर अप्रत्यक्षपणे दोन कोटी लोकांना रोजगार मिळतो. कोरोनामुळे मोठे नुकसान झाले आहे. मुंबईत १५ हजार हॉटेल आणि रेस्टॉरंट आहेत. त्यातील अनेक ठिकाणी भाड्याने व्यवसाय सुरू आहेत. आता तर व्यवसाय बंद आहे. त्यामुळे भाडे कसे द्यायचे, हा प्रश्न असा प्रश्न आहे. कित्येक कामगार राज्य सोडून गेले आहेत त्यामुळे कामगार कसे आणणार?
कामगार आणि पुरेशा पैशाअभावी ३५ ते ४० टक्के रेस्टॉरंट उघडणे शक्य नाही. ग्राहक आले नाही तरी भाडे, गॅस, वीजबिल पाणी बिल हे सर्व देणे गरजेचे आहे. तसेच झालेल्या नुकसानीमुळे अनेक हॉटेलचालकांना कामगार कपात करावी लागेल यामुळे तीन लाखांहून अधिक जण बेरोजगार होतील. आम्हाला इतर परदेशी देशांच्या धर्तीवर काही मदत, उपाययोजनांची सरकारकडून अपेक्षा होती. त्यांनी हॉटेल, रेस्टॉरंट क्षेत्राला या अत्यंत कठीण काळात पाठिंबा दर्शविला आहे. आम्ही आमच्या दैनंदिन खर्च भागवण्यासाठी धडपड करीत असताना शासनातर्फे कोणतीच मदत आजपर्यंत जाहीर झाली नाही, असेही ते म्हणाले.
...उपासमारीने मरण्याची वेळ येईल
लोकांनी दिवसेंदिवस कामगार वाढविले आहेत. काय होईल याची शाश्वती नाही. एकीकडे कोरोना निर्बंधांमुळे हॉटेल रिकामे ठेवण्यात येत आहे तर दुसरीकडे रस्त्यावर फेरीवाल्यांची गर्दी आहे. नियम सर्वांना समान असावा. कोरोना रुग्णसंख्येत घट होत आहे तरीही हॉटेलसाठी निर्बध कायम आहेत. सरकार हॉटेल इंडस्ट्री संपण्याची वाट पाहत आहे का, कोरोनामुळे रोजगार मिळाला नाही तर उपासमारीने मरण्याची वेळ येईल.
शिवानंद शेट्टी, अध्यक्ष, आहार