Join us

राज्यातील इतर भागांप्रमाणेच मुंबईतील शाळाही २४ जानेवारीपासून सुरू होणार, आदित्य ठाकरे यांनी दिली माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 20:15 IST

schools in Mumbai : राज्यातील इतर भागांप्रमाणेच मुंबईतील शाळाही २४ जानेवारीपासून सुरू होतील, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून दिली आहे.

मुंबई - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद करण्याची निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता राज्यासह मुंबईतील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आल्याने राज्यातील शाळा २४ जानेवारीपासून सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र शाळा सुरू करण्याचा निर्णय हा स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आला होता. त्यामुळे मुंबईतील शाळांबाबत चित्र स्पष्ट होत नव्हते. दरम्यान, राज्यातील इतर भागांप्रमाणेच मुंबईतील शाळाही २४ जानेवारीपासून सुरू होतील, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून दिली आहे.

या ट्विटमध्ये आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय हा स्थानिक प्रशासनाने घ्यावा असे सुचवले होते. त्यानुसार मुंबईतील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सोमवार २४ जानेवारीपासून मुंबईतील पहिली ते १२वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात येत आहेत. यावेळी कोविडबाबतचे सर्व नियम पाळले जातील, असे आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच मास्क वापरा आणि सुरक्षित राहा, असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात सरकारने 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. आता 24 जानेवारीपासून पुन्हा शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, स्थानिक प्रशासनाला त्याचे अधिकारही देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला दिली मंजुरी, त्यामुळे सोमवारपासून राज्यात पुन्हा शाळेची घंटा वाजणार आहे, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या होत्या. 

राज्यातील शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आला होता. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही बुधवारी शाळा पुन्हा सुरू होण्याचे संकेत दिले होते. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली होती. मुंबई महापालिका आणि कोविड टास्क फोर्ससोबत आदित्य ठाकरे यांची बैठक पार पडली. यात कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला तसंच शाळा सुरू करण्याबाबतच्या मुद्द्यावरही चर्चा झाल्याचे ते म्हणाले. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसशाळामुंबईआदित्य ठाकरे