मेट्रोप्रमाणे लोकलमध्येही आता नियंत्रित प्रवेश, पश्चिम रेल्वेचा प्रोजेक्ट; बोरिवली, अंधेरीचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 16:08 IST2025-05-20T16:08:05+5:302025-05-20T16:08:24+5:30

१५० वर्षांहून अधिक जुनी वाहतूक प्रणाली असलेल्या लोकलमध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन या प्रणालीत काळानुसार सुधारणा करणे आवश्यक झाले आहे. एसी लोकलच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर आता स्थानकांवर मेट्रोसारखी व्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Like Metro, now access to local trains is controlled, Western Railway's project; Borivali, Andheri included | मेट्रोप्रमाणे लोकलमध्येही आता नियंत्रित प्रवेश, पश्चिम रेल्वेचा प्रोजेक्ट; बोरिवली, अंधेरीचा समावेश

मेट्रोप्रमाणे लोकलमध्येही आता नियंत्रित प्रवेश, पश्चिम रेल्वेचा प्रोजेक्ट; बोरिवली, अंधेरीचा समावेश

महेश कोले -

मुंबई : लोकलमध्ये प्रवास करताना आता मेट्रोसारख्या नियंत्रित प्रवेशाची अंमलबजावणी करण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे. पश्चिम रेल्वेच्या १२ स्थानकांवर हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार असून यासाठी संबंधित स्थानकांची यादी रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आली आहे. या यादीत वांद्रे टर्मिनस, बोरिवली, अंधेरीसह गुजरात विभागातील ९ स्थानकांचा समावेश आहे, अशी माहिती वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

१५० वर्षांहून अधिक जुनी वाहतूक प्रणाली असलेल्या लोकलमध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन या प्रणालीत काळानुसार सुधारणा करणे आवश्यक झाले आहे. एसी लोकलच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर आता स्थानकांवर मेट्रोसारखी व्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
रेल्वे बोर्डाने देशभरातील विविध रेल्वे विभागांकडून संभाव्य स्थानकांची यादी मागवली होती. या प्रकल्पांतर्गत प्रवाशांना मेट्रोप्रमाणे तिकीट तपासणी, सुरक्षा तपासणी आणि फलाटांवर प्रवेश यासाठी ठराविक मार्गाने जावे लागणार आहे.

नियंत्रित प्रवेशामुळे संभाव्य फायदे
ठराविक मार्गांद्वारे प्रवाशांना प्रवेश मिळाल्याने गोंधळ कमी होईल.
तिकीट आणि सुरक्षा तपासणी अधिक काटेकोरपणे करता येईल.
अनावश्यक गर्दी कमी होईल.
विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवता येईल.
मेट्रोप्रमाणे प्रवास अधिक आरामदायक आणि सुसंवादी होईल.

प्रवास सुरक्षित होणार
मेट्रो ही आधुनिक व नियोजित वाहतूक प्रणाली असल्याने तिथे प्रवेश व नियंत्रण यासाठी भरपूर जागा उपलब्ध असते. मेट्रोने प्रवास करताना तिकीट खिडकी आणि प्लॅटफॉर्म वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. 

मात्र, रेल्वे स्थानकांमध्ये अशी सोय नसते. सध्या मुंबईतील काही स्थानकांवर डेक उभारण्यात येत आहेत. भविष्यात या डेकवरच तिकीट खरेदी, सुरक्षा तपासणी आणि नियंत्रित प्रवेशाची व्यवस्था निर्माण करण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 

या पायलट प्रकल्पामुळे रेल्वे स्थानकांवरील गोंधळ कमी होण्यासह प्रवास अधिक सुरक्षित आणि सुसंगत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
 

Web Title: Like Metro, now access to local trains is controlled, Western Railway's project; Borivali, Andheri included

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.