बलात्कारप्रकरणी जन्मठेप कमी करून १२ वर्षांची शिक्षा; महात्मा गांधींवर तुरुंगात लिहिला निबंध
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 06:39 IST2026-02-11T06:39:22+5:302026-02-11T06:39:22+5:30
आरोपीने तुरुंगात असताना शैक्षणिक व सुधारात्मक उपक्रमांमध्ये सहभाग घेतल्याची प्रमाणपत्रे आहेत. त्यात निबंध स्पर्धा तसेच महात्मा गांधींच्या विचारांवरील अभ्यासक्रमातही त्याने सहभाग घेतला, असे न्यायालयाने म्हटले

बलात्कारप्रकरणी जन्मठेप कमी करून १२ वर्षांची शिक्षा; महात्मा गांधींवर तुरुंगात लिहिला निबंध
मुंबई - अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या आरोपीची जन्मठेप मुंबई उच्च न्यायालयाने कमी करून १२ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. गुन्हा घडला तेव्हा आरोपीचे कमी वय, दीर्घ काळाचा कारावास आणि तुरुंगातील सुधारात्मक उपक्रमांतील सहभाग त्यात महात्मा गांधींवरील निबंध कार्यक्रमात घेतलेला सहभाग, या बाबी न्यायालयाने शिक्षा कमी करताना विचारात घेतल्या.
न्या. सारंग कोतवाल आणि न्या. संदेश पाटील यांच्या खंडपीठाने २ फेब्रुवारी रोजी दिलेल्या आदेशात (ज्याची प्रत मंगळवारी उपलब्ध झाली) २०१६ मधील गुन्ह्यातील आरोपीचा दोषत्व कायम ठेवत त्याला ठोठावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेत कपात केली. विशेष पॉक्सो न्यायालयाने दिलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात दोषी आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. खंडपीठाने निकालात नमूद केले की, गुन्हा घडला तेव्हा आरोपीचे वय अवघे २० वर्षे होते, त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती.
डिसेंबर २०१६ पासून तो कोठडीत असून कोविड-१९ महामारीच्या काळातही त्याची सुटका करण्यात आलेली नव्हती, तसेच आरोपीने तुरुंगात असताना शैक्षणिक व सुधारात्मक उपक्रमांमध्ये सहभाग घेतल्याची प्रमाणपत्रे आहेत. त्यात निबंध स्पर्धा तसेच महात्मा गांधींच्या विचारांवरील अभ्यासक्रमातही त्याने सहभाग घेतला, असे न्यायालयाने म्हटले. गुन्ह्याचे गांभीर्य आणि सुधारात्मक घटक यांचा समतोल साधत खंडपीठाने म्हटले की, आमच्या मते, १२ वर्षांची शिक्षा न्याय्यतेची पूर्तता करेल. आरोपीने आतापर्यंत तुरुंगात भोगलेला कालावधी कमी केलेल्या शिक्षेतून वजा (सेट-ऑफ) करण्यात येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
सरकारी वकिल म्हणतात
९ डिसेंबर २०१६ रोजी पीडित मुलगी (तेव्हाचे वय पाच वर्षे) पाणी आणण्यासाठी शेजाऱ्याच्या घरी गेली असता, आरोपीने लैंगिक अत्याचार केला. घाबरलेल्या मुलीने याबाबत आईला सांगितले. आईने आरोपीला जाब विचारला व पोलिसांत तक्रार दिली. पीडितेने वयाच्या आठव्या वर्षी साक्ष दिली. उच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलीची साक्ष विश्वासार्ह व सुसंगत असल्याचे नमूद केले. तिने कोणत्याही शिकवणीशिवाय घटना मांडल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.