Join us  

आयुर्विमा होणार ‘सरल’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 4:35 PM

Life insurance : सर्व कंपन्यांच्या टर्म विमा पॉलिसीचे प्रमाणिकरण

विम्याच्या प्रसारासाठी आयआयडीएआयचे नवे धोरण

मुंबई आरोग्य आणि आर्थिक अशा दोन्ही आघाड्यांवरील सध्याच्या अस्थिर वातावरणात जास्तीत जास्त लोकांनी आयुर्विमा पॉलिसी काढावी यासाठी इन्शुरन्स रेग्युलेटरी अथाँरीटी आँफ इंडियाने (आयआरडीएआय) पुढाकार घेतला आहे. त्यासाठी सरल जीवन विमा ही विशेष पॉलिसी तयार करण्यात आली आहे. सर्व विमा कंपन्यांना एकसमान स्वरुपाची आणि लघुत्तम प्रिमियम असलेली पॉलिसी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सध्या अस्तित्वात असलेल्या टर्म विमा पॉलिसीचे निकष अत्यंत किचकट आहेत. ते अनेकांच्या आकलानापलिकडचे आहेत. काहींना ते समजून घेण्यासाठी पुरेसा वेळही नसतो. त्यामुळे हा विमा काढण्याचे प्रमाण कमी आहे. ग्राहकांचा हा गोंधळ कमी करून विमा पाँलिसीचे कवच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी टर्म पॉलिसीचे प्रमाणिकरण करून त्यात सुसूत्रता आणणे अत्यावश्यक झाले आहे असे मत आयआरडीएआयने या विशेष पॉलिसी जाहीर करताना व्यक्त केले आहे. या पॉलिसीबाबतच्या आपल्या हरकती आणि सूचनांसह प्रस्ताव डिसेंबर, २०२० पर्यंत सादर करण्याचे आदेश विमा कंपन्यांना देण्यात आले आहेत. त्यानंतर १ जानेवारीपासून या पॉलिसी बाजारात उपलब्ध होऊ शकतील असा अंदाज आहे. या पॉलिसीसाठी स्वतंत्र नाव ठेवण्याची मुभा कंपन्यांना नसून ती सरल जीवन विमा या नावाखालीच ग्राहकांना विकावी लागणार आहे.

पाच ते २५ लाखांपर्यंतचे संरक्षण : या पॉलिसीअंतर्गत १८ ते ६५ वर्षे वयोगटापर्यंतचे नागरिक पाच ते २५ लाख रूपयांपर्यंतचे विमा संरक्षण घेऊ शकतात. किमान पाच आणि कमाल ४० वर्षांच्या कालावधीसाठी ही पॉलिसी घेता येणार असून त्याचा मँच्युरीटीचे वय ७० वर्षे असेल. या पॉलिसीमुळे सर्वसामान्य जनतेपर्यंत विम्याचा प्रसार होईल आणि त्यांना विम्याचे संरक्षण मिळेल असा विश्वास आयआरडीएआयने आपल्या परिपत्रकात व्यक्त केला आहे.     

 

टॅग्स :आरोग्यमुंबईमहाराष्ट्र