वॉचमनला ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा कायम, पल्लवी पुरकायस्थ हत्या प्रकरणी हायकाेर्टाचा निकाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 07:49 IST2025-11-11T07:45:45+5:302025-11-11T07:49:32+5:30
Court News: वकील पल्लवी पुरकायस्थ हिच्या २०१२ मधील हत्येप्रकरणात दोषी ठरलेल्या सुरक्षा रक्षकाला सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी कायम ठेवली. न्या. ए. एस. गडकरी आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाने राज्य सरकार आणि पल्लवीच्या वडिलांनी दाखल केलेले अपीलही फेटाळले.

वॉचमनला ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा कायम, पल्लवी पुरकायस्थ हत्या प्रकरणी हायकाेर्टाचा निकाल
मुंबई - वकील पल्लवी पुरकायस्थ हिच्या २०१२ मधील हत्येप्रकरणात दोषी ठरलेल्या सुरक्षा रक्षकाला सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी कायम ठेवली. न्या. ए. एस. गडकरी आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाने राज्य सरकार आणि पल्लवीच्या वडिलांनी दाखल केलेले अपीलही फेटाळले. आरोपी साजिद मुगल पठाण याला दिलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेत वाढ करून मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी सरकार आणि पल्लवीच्या वडिलांनी केली होती.
जुलै २०१५ मध्ये सत्र न्यायालयाने पठाणला पल्लवी पुरकायस्थच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यावेळी न्यायालयाने नमूद केले होते की, हे प्रकरण ‘दुर्मिळातील दुर्मीळ’ या श्रेणीत येत नसल्यामुळे आरोपीला मृत्युदंड देणे योग्य ठरणार नाही.
नेमके काय प्रकरण?
पठाणने मुद्दाम पल्लवीच्या फ्लॅटचा वीजपुरवठा बंद केला होता, त्यामुळे तिला इलेक्ट्रिशियन बोलावून तो दुरुस्त करावा लागला आणि त्यादरम्यान त्याला घराची चावी मिळवण्याची संधी मिळाली. ८ आणि ९ ऑगस्टच्या दरम्यानच्या रात्री पठाणने ती चावी वापरून घरात प्रवेश केला आणि पल्लवीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्यावर त्याने तिचा गळा चिरला आणि घटनास्थळावरून पळ काढला. ९ ऑगस्टच्या सकाळी अविक सेनगुप्ता कामावरून परतला तेव्हा त्याला पल्लवीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला.