मराठी विभागातील ग्रंथालय कुलूपबंद; पंखे, विद्युत दुरुस्तीसाठी मुंबई विद्यापीठाला मिळेना वेळ; वर्षभरापासून खोळंबले काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 07:48 IST2025-07-17T07:47:56+5:302025-07-17T07:48:07+5:30
- अमर शैला लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असताना दुसरीकडे मात्र मराठी विषयाची ...

मराठी विभागातील ग्रंथालय कुलूपबंद; पंखे, विद्युत दुरुस्तीसाठी मुंबई विद्यापीठाला मिळेना वेळ; वर्षभरापासून खोळंबले काम
- अमर शैला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असताना दुसरीकडे मात्र मराठी विषयाची अवहेलना थांबण्याची चिन्हे नाहीत. मुंबई विद्यापीठातील मराठी विभागातील ग्रंथालयाच्या दुरुस्तीचे काम जवळपास वर्षभरापासून खोळंबले आहे. विद्यापीठाला दुरुस्तीसाठी वेळ मिळत नसल्याने बहुमूल्य ग्रंथसंपदा धूळ खात पडली आहे. विद्यार्थ्यांना ग्रंथालयात बसून भाषेचा अभ्यास आणि संशोधन करता येत नसल्याची स्थिती आहे.
मुंबई विद्यापीठातील मराठी विभागाच्या रानडे भवनमधील इमारतीतील ग्रंथालयात तब्बल ६ ते ७ हजार पुस्तके आहेत. विभागाच्या माजी विभागप्रमुख प्रा. उषा देशमुख, तसेच प्रा. गंगाधर पाटील यांनी त्यांच्या घरातील पुस्तके विभागाच्या ग्रंथालयाला भेट दिली आहेत. यामध्ये मराठीतील साहित्यासह, समीक्षा, संदर्भ ग्रंथ आहेत. दरम्यानच्या काळात ग्रंथालयाच्या डागडुजीसाठी हे ग्रंथालय बंद केले आहे. विद्यापीठाने डागडुजीची आणि रंगरंगोटीची कामे केली; मात्र ग्रंथालयात पंखे बसविण्यासह इलेक्ट्रिक कामे करण्याचा विसर प्रशासनाला पडला आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या मुख्य ग्रंथालयाचा आधार घ्यावा लागतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना तिसऱ्या आणि चौथ्या सत्रात संदर्भ ग्रंथावरून प्रकल्प तयार करावे लागतील; मात्र ग्रंथालय बंद असल्याने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ग्रंथ हाताळून अभ्यासणे शक्य होणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.
सध्या ग्रंथालयात बसता येत नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या मुख्य ग्रंथालयात बसून अभ्यास करतो, अशी माहिती एका विद्यार्थिनीने दिली.
आठवडाभरात काम पूर्ण
ग्रंथालयाच्या डागडुजीचे काम केले आहे. आता पंख्यांची आणि इलेक्ट्रिकची कामे सुरू आहेत. ती आठवडाभरात पूर्ण केली जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी ग्रंथालयात सध्या बसत नाहीत. विद्यार्थ्यांनी मागणी केल्यावर त्यांना आवश्यक ग्रंथ उपलब्ध करून दिले जातात, अशी माहिती मराठी विभागाचे प्रमुख डॉ. विनोद कुमरे यांनी दिली.
ग्रंथालय तत्काळ स्थानांतरित करा!
विद्यापीठात विद्यार्थ्यांना मुख्य ग्रंथालयात पुस्तके मिळत नाही; मात्र त्या-त्या विषयाच्या संदर्भातील पुस्तके विभागातील ग्रंथालयात सहजरित्या मिळतात. मराठी विभागाचे ग्रंथालय वर्षभरापासून बंद असणे दुर्दैवी आहे. विद्यापीठाला विभागाचे हे ग्रंथालय दुरुस्त करणे शक्य नसल्यास त्यांनी तत्काळ अन्य चांगल्या खोलीत स्थानांतरित करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी माजी सिनेट सदस्य संजय वैराळ यांनी केली.