पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नातील नवीन भारत घडवूया, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे प्रतिपादन
By मनोहर कुंभेजकर | Updated: March 18, 2023 19:28 IST2023-03-18T18:55:23+5:302023-03-18T19:28:54+5:30
या रोजगार मेळाव्यासाठी विविध नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.तर हजारो युवक युवतींनी या मेळाव्याचा लाभ घेतला.

पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नातील नवीन भारत घडवूया, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे प्रतिपादन
मुंबई : राज्यातील प्रत्येक बेरोजगाराला नोकरी देणे, स्वयंरोजगारासाठी सहाय्य करणे हे आमचे कर्तव्य आहे. या माध्यमातूनच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील नवीन भारत निर्माण करू, असे प्रतिपादन मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. कांदिवली पूर्व येथे प्रमोद महाजन मैदानात कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्राचे आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार भातखळकर यांसह कौशल्य विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या रोजगार मेळाव्यासाठी विविध नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.तर हजारो युवक युवतींनी या मेळाव्याचा लाभ घेतला.
पालकमंत्री लोढा म्हणाले की, विविध कंपन्यांना आवश्यक मनुष्यबळ हवे असते आणि शिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरीची आवश्यकता असते यामधील दुवा आमदार अतुल भातखळकर यांच्या रूपाने या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तयार झाला आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात अशा पद्धतीचे मेळावे महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
आमदार अतुक भातखळकर म्हणाले की, या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आपण प्रत्येक वॉर्डात त्यांच्या कॅम्प आयोजन केले, ऑनलाइन रजिस्ट्रेशन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रजिस्ट्रेशन झाले आहे. अनेकदा शिक्षण पूर्ण झाल्यावर कोणत्या कंपनीशी संपर्क साधावा हे माहीत नसते त्यामुळे या मेळाव्याच्या माध्यमातून बेरोजगार तरुण-तरुणींसाठी ही एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. नोकरी बरोबरच स्वयंरोजगारासाठी मुद्रा सारख्या योजनेतून अर्थसहाय्य उपलब्ध होते. लवकरच आम्ही या योजनेच्या संदर्भात मेळावा आयोजित करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रारंभी पालकमंत्री लोढा यांचा सत्कार आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आला.तर आमदार भातखळकर यांचा सत्कार कौशल्य विकास अधिकारी पाठक यांच्या हस्ते करण्यात आला.